गणेशोत्सवाच्या तयारीला वेग
By Admin | Updated: August 25, 2014 23:49 IST2014-08-25T23:49:31+5:302014-08-25T23:49:31+5:30
गणेश चतुर्थी जवळ येऊ लागल्यामुळे गणपती मूर्ती बनविण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना सर्वप्रथम गणरायाचे पूजन आणि स्तवन केले जाते.

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग
भंडारा : गणेश चतुर्थी जवळ येऊ लागल्यामुळे गणपती मूर्ती बनविण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना सर्वप्रथम गणरायाचे पूजन आणि स्तवन केले जाते.
भारतीय संस्कृतीत गणेशाला सर्वप्रथम मान देण्यात येतो. येत्या २९ आॅगस्टला गणरायाचे घराघरांत व सार्वजनिक ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला शहरासह ग्रामीण भागात वेग आला आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी व गावात शांतता व धार्मिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने सन १९३४ मध्ये पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.
तेव्हापासून आजतागायत घराघरात व लहानमोठ्या खेड्यापाड्यात बाप्पा पोहोचले. यावर्षी कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र गणरायाची दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, न चुकता शेतकरी सुख दु:ख विसरून स्थापना करतात. गणेशोत्सवासाठी बालगोपाल, गणेश मंडळांचे सदस्य, बाप्पांच्या स्वागतासाठी आतापासूनच धडपड करताना दिसत आहे.
एक गाव - एक गणपती, या राज्य शासनाच्या संकल्पनेला गणेश मंडळांनी प्रतिसाद न दिल्याने शहरातील अनेक चौकाचौकांत व ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दोन ते तीन गणेश मंडळ दिसत आहेत. बहुतांश घरांमध्येही गणरायाची स्थापना होते. त्यामुळे मूर्तीकारांकडे गणपतीच्या बुकींगलाही वेग आला आहे. आता जवळपास सर्वच मूर्तीचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. रंगरंगोटीचा अंतिम हाथ सुरू आहे.
याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी मंडप डेकोरेशन, लायटींग, डीजीटल बॅनर, आकर्षक गेटची उभारणी करताना गणेश मंडळांचे सदस्य व्यस्त आहेत. गणपतीच्या आगमनासाठी व विसर्जनासाठी बँड, डी.जे.चे बुकींगही गणेश मंडळाकडून करण्यात येत आहे. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वच उत्सुक दिसून आहेत. पोलिसांनीही विविध गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)