स्पीड गनने रोखला दोन हजार चारशे अकरा वाहनांचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST2021-02-05T08:38:48+5:302021-02-05T08:38:48+5:30
भंडारा: भंडारा पोलीस दलामध्ये वाहतूक शाखेत दाखल झालेल्या स्पीडगन कारमुळे वर्षभरात तब्बल दोन हजार ४११ वाहनांचा वेग ...

स्पीड गनने रोखला दोन हजार चारशे अकरा वाहनांचा वेग
भंडारा: भंडारा पोलीस दलामध्ये वाहतूक शाखेत दाखल झालेल्या स्पीडगन कारमुळे वर्षभरात तब्बल दोन हजार ४११ वाहनांचा वेग रोखला गेला आहे. या स्पीडगनमुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग आता मंदावला आहे. या स्पीड गनमध्ये अती वेगाने वाहणाऱ्या वाहनांचा वेग ऑनलाइन तपासून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात होते. यामध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वाधिक ५१२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर अखेरीस ४३९ वाहनांवर तर, जानेवारी महिन्यात ४२१ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचे संकट सुरू होताच कारवाईचे प्रमाण देखील घटले. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये ३९२ वाहनांवर कारवाई झाली तर नोव्हेंबर महिन्यात २३८ वाहनांवर, त्याखालोखाल ऑक्टोबर महिन्यात १९२ वाहनांवर,सप्टेंबर महिन्यात ८४ वाहनांवर तर जुलै महिन्यात ७१ वाहनांवर तर ऑगस्ट महिन्यात ४४ जून महिन्यात १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले. स्पीड गनने भंडारा पोलिसांवरील ताण आता कमी झाला असून या स्पीडगनमुळे अतिवेगवान जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची एक नवी ऑनलाईन सुविधा वाहतूक शाखेला उपलब्ध झाली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांनी सांगितले. महामार्गावरील चार चाकी वाहनाचा ९० चा निर्धारित केलेला वेग ओलांडल्यास कारवाई होते. ही सर्व माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई कार्यालयात जाते.तेथे ही माहिती पडताळणी करून चलन अंतिम करतात. गाडी मालकाच्या मोबाईलवर चलन व दंड किती आकारण्यात आला याची माहिती पाठवली जाते. ओव्हर स्पीडचा दंड एक हजार रुपये तर हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये तर ब्लॅक फिल्मिंग २०० दोनशे रुपये असा दंड आकारण्यात येतो. याचा संदेश येतो. त्यानंतर तो कोणत्याही वाहतूक शाखेत जाऊन आपले चलन भरून पावती बनवू शकतो. वाहनाद्वारे यासोबतच वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी गीते तसेच इतरही कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात वाहतूक कोंडी तसेच महामार्गावरील वाहनधारकांचा वेग रोखण्यात मदत झाली असल्याचे सांगितले.
बॉक्स
स्पीड गनने असा मोजला जातो धावत्या वाहनांचा वेग
राष्ट्रीय महामार्गावर कुठेही उभ्या असलेल्या स्पीडगन वाहनाच्या रेंजमध्ये वाहन आले की वाहनांची नंबर प्लेट स्पष्ट दिसेल अशाप्रकारे स्पीडगन मधील लेझर मारून वेगाची तपासणी केली जाते.चारचाकी वाहनांचा नव्वदच्या वर वेग असल्यास या वाहनांवर कारवाई होते. स्पीड गनच्या साह्याने शंभर ते दीडशे मीटर रेंजद्वारे ही कारवाई होते. याशिवाय दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरलेले नसल्यास त्याच्या दुचाकी क्रमांकासह त्यांनी हेल्मेट न घातलेला त्याचा चेहरा स्पष्ट दिसेल अशाच वाहनधारकांवर कारवाई होते. याचे रिपोर्ट मुंबई तसेच पुणे येथे जातात त्यानंतर तेथून प्रत्येक जिल्हा स्तरावर अचूक आणि स्पष्ट दिसणाऱ्या वाहन धारकांच्या कारवाईचे संदेश हे दिले जातात. त्यानंतरच प्रत्येक जिल्हास्तरावर किती वाहनांवर कारवाई झाली याचे रेकॉर्डिंग पाठवले जाते. यासोबतच वाहनधारकांना कारवाई झाल्यास राज्यात कुठेही चलन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कोट
वाहतूक शाखेकडे उपलब्ध असलेल्या इंटरसेप्टर वाहनातील स्पीड गनचा वापर करून वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. ही कारवाई ऑनलाईन होते. याचा वाहनधारकांना संदेश येतो त्यानंतर ते कोणत्याही वाहतूक शाखेत जाऊन चलन भरू शकतात.यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग रोखण्यास व अपघात रोखण्यासाठी चांगली मदत होत आहे.
शिवाजी कदम,
पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा, भंडारा