Speculation on the speculators market after exit poll | एक्झिट पोलनंतर उडाली सट्टा बाजारात खळबळ

एक्झिट पोलनंतर उडाली सट्टा बाजारात खळबळ

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : एकच चर्चा, कोण विजयी होणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विधानसभा निवडणुकीचे विविध एक्झिट पोल सोमवारी सायंकाळी घोषित झाल्यानंतर सट्टा बाजारात खळबळ उडाली आहे. उमेदवारांचे दर निवडणुकीपूर्वी ठरले होते. मात्र आता एक्झिट पोल आणि सट्टा बाजारात वेगळे चित्र दिसत आहे. तर गावागावांत कोण विजयी होणार याची एकच चर्चा असून उमेदवारांचे समर्थक दावे प्रतिदावे करीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू तुमसर विधानसभा मतदार संघ आहे. यावेळी येथे अत्यंत चुरशीची लढत झाली. प्रमुख राजकीय उमदेवारांसह अपक्षांनी येथे दंड थोपटले होते. प्रत्येकाने विजयासाठी गावांगाव पिंजून काढले. मतदानापुर्वी सट्टा बाजाराचे दर निश्चित झाला होता. मतदान सुरु असताना सट्टा बाजारात मोठी उलथापालत झाली. मतदानाची सरासरी ७०.४६ टक्के झाल्याने सट्टा बाजार स्तब्ध झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता विविध चॅनल्सवर महाराष्ट्राचा एक्झिट पोल दाखवायला सुरुवात झाली. महायुती पुन्हा सत्तेत येणार असे चित्र दाखविले जात होते. त्यामुळे तुमसरच्या सट्टा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी लाखो रुपये या सट्ट्यावर लावले आहे.
ग्रामीण भागातही मतदानादरम्यान चुरश दिसत होती. ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसारखी यंदाची निवडणूक चुरशीची झाली. विजयावरुन राजकीय पंडीत बुचकळ्यात पडले आहे. दुसरीकडे मतदानाच ट्रेंड कुठे जात आहे, याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. मंगळवारी आठवडी बाजारात ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्त्यांचे फड जमा झाले होते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दावे प्रतिदावे करतांना दिसत होते. उमेदवारांचे समर्थक प्रत्येक गावातून मतदानाची आकडेवारी घेवून आकडेमोड करतांना दिसत होते. बुथनिहाय कोण कुठे चालला याचे गणित मांडले जात होते.

सट्टा लावणारे द्विधामनस्थितीत
तुमसर शहरासह जिल्ह्यातील अनेकांनी या निवडणुकीत सट्टा लावल्याची माहिती आहे. मात्र मतदानानंतर भावात चढउतार झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सट्टा बाजारात उमेदवाराचा भाव कमी असतो. त्याचा विजय मानला जातो. या अजब-गजब प्रकारात अनेकांचे दिवाळीपुर्वीच दिवाळे निघण्याची शक्यता आहे.

Web Title: Speculation on the speculators market after exit poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.