पीक कर्ज वाटपासाठी विशेष शिबिर
By Admin | Updated: June 6, 2016 00:37 IST2016-06-06T00:37:03+5:302016-06-06T00:37:03+5:30
खरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळीच मिळण्याकरीता २८२ गावांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

पीक कर्ज वाटपासाठी विशेष शिबिर
भंडारा : खरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळीच मिळण्याकरीता २८२ गावांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी गावनिहाय १३ ते १५ जून या कालावधीत आयोजित केलेल्या या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या शिबिरात सरपंच व पोलीस पाटील उपस्थित राहून योजनेची माहिती देणार आहेत. तसेच तलाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, डि.डी.सी. बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची यादी शिबिराच्या चार दिवसाआधी संबंधित शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहे. ज्या प्रकरणामध्ये त्रुटी आढळून येईल, अशा प्रकरणात सात दिवसाचे आत शेतकऱ्यांकडून पुर्तता करुन शिबिराचे दिवशीच पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार. या शिबिरासाठी तालुका निहाय समन्वयक अधिकारी म्हणून भंडारा- उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, पवनी- जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजया बनकर, तुमसर- उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मोहाडी- उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय उरकुडे, साकोली- उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, लाखांदूर- उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी व लाखनी, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांची संख्या व कालावधी याप्रमाणे आहे. भंडारा - ८६ गावे, पवनी-३३ गावे, तुमसर- ५७ गावे, मोहाडी- २५ गावे, साकोली ३६ गावे, लाखांदूर- २१ गावे, लाखनी- २४ गावे अशी एकूण २८२ गावात हे शिबिर १३ जून ते १५ जून २०१६ या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होणार आहेत.या विशेष शिबिराचा लाभ घेवून पीक कर्ज उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)