सभापती व तलाठी वाद पोहोचला ठाण्यात
By Admin | Updated: August 9, 2014 00:47 IST2014-08-09T00:47:22+5:302014-08-09T00:47:22+5:30
सिंदपुरी येथे मालगुजारी तलाव फुटून १७ दिवस झाले. महसूल प्रशासनाने येथे नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा केला नाही.

सभापती व तलाठी वाद पोहोचला ठाण्यात
तुमसर : सिंदपुरी येथे मालगुजारी तलाव फुटून १७ दिवस झाले. महसूल प्रशासनाने येथे नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा केला नाही. खावटी दिली नाही, शासकीय मदत दिली नाही. ग्रामस्थांनी तीनदा निवेदन देऊनही दखल का घेत नाही, यावरुन पंचायत समिती सभापती कलाम शेख आणि तलाठी भावे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर भावे यांनी कामात व्यत्यय आणला, या आशयाची शेख यांच्याविरुद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन सभापती शेख यांच्याविरूद्धात सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दि.२२ जुलै रोजी पहाटे सिंदपुरी येथील मालगुजारी तलावाची पाळ फूटली. संपूर्ण गाव वाहून जाण्याची भिती होती. सुदैवाने दुसरीकडून तलावाची पाळ ग्रामस्थांनी फोडल्याने संकट टळले. प्रशासनाने येथे तात्काळ धाव घेतली नव्हती. सिंदपुरी येथील ६० ते ७० घरांना या तलावातील पाण्याचा फटका बसला. ते कुटूंब सध्या गावातील विष्णु मंदीर, हनुमान मंदीर व स्थानिक नागरिकांचया घरी आश्रयास आहेत. महसूल प्रशासनाचा गावातील मुख्य कर्मचारी तलाठी भावे यांनी पिडीतांची पूर्ण यादी तयार केली नाही. खावटी मदतीचा प्रस्ताव व पडलेल्या घरांचे पंचनामे अद्याप तयार केले नाही. ज्यांना पाण्याचा फटका बसला त्यांचे नाव मदत यादीत नाही तर ज्यांना फटका बसला नाही त्यांची नावे सर्रास या यादीत तलाठी भावे यांनी नोंदविली आहेत.
ग्रामस्थांकडून चिरीमिरी घेवून खोटी नावे मदत यादीत घातल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. घरांचे पंचनामे तात्काळ तयार करा, असे निर्देश सभापती कलाम शेख यांनी तलाठी भावे यांना दिले. यादीसंदर्भात जाब विचारला सभापती शेख व भावे यांच्यात शाब्दिक वाद झाला. शासकीय मदत व पंचनामे याकरिता शेख यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना दिले. परंतु आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. ग्रामस्थांसोबत सभापती शेख यांनी तहसीलदार सचिन यादव यांनी भेट घेतली होती. दरम्यान तुम्ही नायब तहसीलदारांना भेटा, असे सांगण्यात आले. इकडून तिकडे चेंडू टोलविला जात आहे.
महसूल प्रशासन उदासीन
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सिंदपुरी येथील मालगुजारी तलावाची पाळ फूटली. यातून प्रभावित व बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने तात्काळ कोणती मदत करता येईल ती नियमानुसार करणे तेवढेच गरजेचे आहे. घरे सध्या धोकादायक स्थितीत आहेत. घरात प्रवेश कसा करावा, प्रवेश करतानी भीती वाटते, असे ग्रामस्थांनी सांगितले. तलाठी भावे यांचेशी शाब्दिक चकमक प्रकरणी भावे यांनी संघटनेसह तहसीलदारांना कामबंद आंदोलनाचे निवेदन शुक्रवारी दिले. यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ विरूद्ध प्रशासन अशी संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)