पेरणीची धामधूम आणि पावसाची ‘ सामसूम’

By Admin | Updated: July 13, 2015 00:50 IST2015-07-13T00:50:58+5:302015-07-13T00:50:58+5:30

सध्या हिंदूचा अधिकमास व मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. दोनही धर्मात हे महिने पवित्र समजले जातात.

Sowing of rain and rain 'Samasoom' | पेरणीची धामधूम आणि पावसाची ‘ सामसूम’

पेरणीची धामधूम आणि पावसाची ‘ सामसूम’

अंकुर करपले : पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे दुबार पेरणीचे सावट
भंडारा : सध्या हिंदूचा अधिकमास व मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. दोनही धर्मात हे महिने पवित्र समजले जातात. या दोन्ही धमांचा संगम मंदिर, मशिदीत पाहायला मिळत असून सर्व समाजातील बांधव देवापुढे विनवणी करु लागले आहे. धोंडी धोंडी पाणी दे चा सुरही ग्रामीण भागातून निघू लागला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावताना दिसत आहे. जमिनीला भेगा पडत आहेत.
मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांंनी पेरणी केली. मात्र गेल्या १५ दिवसांपासून वरुण राजाची वक्रदृष्टी झाल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे चिंतातूर झाला आहे. काही शेतकरी शेतातील पिकांना डब्याने पाणी देत आहे. मृग नक्षत्रात यावर्षी ७ जुनला तात्पुरती हजेरी पावसाने लावली होती. नंतर दोन-चार दिवसांनी धो-धो बरसला तो एवढा की जून महिन्याची सरासरीही पावसाने ओलांडली होती. दमदार पावसाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र नंतर चांगली उघाड दिली. गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. पावसाने दडी दिल्याने पेरलेल्या बियाण्यांचे अंकुर मात्र या तळपत्या उन्हाने जळू लागले आहे. काही बियाणे हे मातीच्या ओलाव्यामुळे अंकुरले आता तेही खराब झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
भंडारा तालुक्यातील शेतकरी मागील तीनचार वर्षांपासून नापिकीचा व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहे. गेल्या ७ ते ८ महिन्यांत दोनवेळा वादळी पावसाने फटका दिला होता. यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आपले उग्ररुप दाखवले होते. त्यात भर म्हणून लोकप्रतिनिधींचे फक्त मदतीचे आश्वासन ऐकत असून सरकारचेही शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण दिसत असल्याने शेतकरी पार खचला आहे.
बँकचे कर्ज काढून, कुणी पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून बियाणे व स्वत:ची खरेदी केली तर काहींनी हात उसनवारीही केली होती. बियाणे व खतांचे भावसुध्दा गगनाला भिडल्याने त्यालासुध्दा सामोरे जावे लागले हे सगळे सहन करुन त्याने आपले वर्षभराचे पीक उभे करण्यासाठी पेरणी केली. पण आता चक्क पावसाने डोळे मिटविल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sowing of rain and rain 'Samasoom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.