पेरणी ५६%, रोवणी ५०%, पाऊस ५८%
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:39 IST2017-08-18T22:39:01+5:302017-08-18T22:39:35+5:30
जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत.

पेरणी ५६%, रोवणी ५०%, पाऊस ५८%
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. सद्यस्थितीत १६ आॅगस्टपर्यंत भंडारा जिल्ह्यात धान पिकाची केवळ ५६ टक्के पेरणी, रोवणी ५० टक्के तर पाऊस ५८ टक्के झाला आहे. विशेष म्हणजे रोवणीनंतर पाऊस न आल्याने यावर्षी कोरड्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वरुणराजाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस धानपिकाला तारणार का? असा प्रश्न आहे. परंतु आता पाऊस येऊनही त्याचा उपयोग नसल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे.
भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ४९ टक्के असल्याची सांगण्यात येते. भात नर्सरी लागवडीची टक्केवारी ९४.५० टक्के इतकी आहे.
भंडारा तालुक्यात ११ हजार २२२ हेक्टर, मोहाडी ८ हजार ०२२ हेक्टर, तुमसर १४ हजार ७०५ हेक्टर, पवनी १९ हजार ६४६, साकोली ११ हजार ७३५, लाखनी १५ हजार ११३ तर लाखांदूर तालुक्यात २२ हजार ३७० हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र सिंचनाची सुविधाच उपलब्ध नसल्याने व वरुण राजाच्या वक्रदृष्टीमुळे सिंचन तरी कसे करायचे असा प्रश्न बळीराजासमोर निर्माण झालेला आहे.
कर्जबाजारीपणा, कर्जमुक्तीची फसवेगिरी, पिक विम्याचा न मिळालेला लाभ या समस्यांमध्ये वेढलेल्या बळीराजावर संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक असून १५ आॅगस्टपर्यंत निम्म्याहून अधिक शेतकºयांची रोवणी झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. भंडारा तालुक्यात ४१ टक्के, मोहाडीत २७ टक्के, तुमसर ४१ टक्के, पवनी ५९ टक्के, लाखांदूर ६९ टक्के, लाखनी ५९ टक्के तर साकोली तालुक्यात ५९ टक्के रोवणी झाली आहे. परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यावर्षी ५३ टक्के रोवणी झाल्याची माहिती दिली आहे. ९७ हजार ७३७ इतक्या क्षेत्रात रोवणी झाल्याचे सांगितले आहे.
प्रकल्पांमध्ये २० टक्के जलसाठा
मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावांमध्येही जलसाठा घसरला आहे. सद्यस्थितीत ६३ प्रकल्पांमध्ये २०.३८ टक्के जलसाठा आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊनही प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढण्यापेक्षा खालावत आहे. आता समाधानकारक पाऊस न बरसल्यास पाणी टंचाईसह जनावरांचा चारा व लघु उद्योगांना फटका बसू शकतो. पावसाअभावी रोवणी होऊ न शकल्याने तांदूळ उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पेरणी क्षेत्र कमी त्यापाठोपाठ रोवणीही कमी झाल्याने उत्पादन कमी झाले तर धानाचे दर वाढण्याची शक्यता आहे.