मोहाडीत बनावट विदेशी मद्यविक्री जोरात

By Admin | Updated: May 11, 2014 23:12 IST2014-05-11T23:12:20+5:302014-05-11T23:12:20+5:30

तालुक्यातील अनेक बीअरबारमध्ये बनावट विदेशी मद्यविक्रीचा व्यवसाय फोफावण्याची खळबळजनक माहिती हाती आली असून यामुळे आंबटशौकिनांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Sophisticated Texture Exotic Alcohol Liquor | मोहाडीत बनावट विदेशी मद्यविक्री जोरात

मोहाडीत बनावट विदेशी मद्यविक्री जोरात

मोहाडी : तालुक्यातील अनेक बीअरबारमध्ये बनावट विदेशी मद्यविक्रीचा व्यवसाय फोफावण्याची खळबळजनक माहिती हाती आली असून यामुळे आंबटशौकिनांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. मद्यप्राशन करणे हा तरुण वर्गाचा नवीन शौक झालेला आहे. त्यामुळे ओल्या पार्ट्या व एखाद्या कारणास्तव मद्यप्राशन करणे ही सवय वाढण्याने आंबट शौकिनांबरोबरच बीअरबारची संख्यासुद्धा वाढलेली आहे. कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमाविण्याच्या हव्यासापोटी कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशीच प्रवृत्ती काही अपवाद वगळता अनेक बीअर मालकांनी अवलंबून लोकांच्या जीवनाशी सर्रास खेळण्याचा प्रकार चालविला आहे. नामांकित ब्रांडेड कंपनीची अनेक मद्यपेय बाजारात असून जास्त चलन असणार्‍या मद्यांच्या बाटल्यांचे गोंदिया व मध्य प्रदेशात रिबॉटलिंग करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. तेथून मोहाडी व तालुक्यातील बीअरबारमध्ये हा नक्की माल आणून विकण्यात येत आहे. हा नकली माल सकाळी ९ ते १० च्या दरम्यान आणण्यात येतो, अशी माहिती आहे. सध्या बीअरबारमध्ये मिळणार्‍या विदेशी मद्याची किंंमत वाढविण्यात आली आहे. नेमका याचाच फायदा बीअरबार मालक नकली माल देऊन उचलत आहेत व मालामाल होत आहेत. मोहाडी येथील बीअरबारमधून मद्यप्राशन केल्यावर एकाही ग्राहकाला पक्के बिल देण्यात येत नाही. पक्के बिल मागितल्यावर हा कर, तो कर लागेल असे सांगून जास्तीचे पैसे मागण्यात येतात. त्यामुळे कोणीही पक्के बिल घेत नाही. याचा फायदा नकली मद्य विकण्यासाठी व कर चुकविण्यासाठी करण्यात येतो. बीअरबारमधून रिकाम्या झालेल्या व जास्त चलन असणार्‍या मद्याच्या रिकाम्या बाटल्या नकली मद्य निर्माते विकत घेऊन जातात व या मद्याच्या बाटल्यात स्पिरिट व रासायनिक पदार्थ मिसळून निकृष्ट दर्जाचे जीवघेणे मद्य तयार करून या बाटल्या पुन्हा सील केल्या जातात. परंतु या बाटल्यातील मद्याची चव खर्‍या मद्यापेक्षा थोडी वेगळीच असते. परंतु मद्यपी आपल्याच तालात राहत असल्याने त्यांना हे कळतच नाही. काही शहाण्यांना हे कळते व ते बाचाबाची करून दुसरी बॉटल मागवून घेतात. रिबॉटलिंग करताना त्याला खर्‍या मद्यासारखा रंग व चव येण्यासाठी त्यात विषारी रासायनिक द्रव मिसळलेले मद्य भरले जात असल्याने हे मद्य स्लो पॉयझनिंंगचे कार्य करते. हा जीवघेणा प्रकार राजरोसपणे चालू असून याची जाण उत्पादन व शुल्क विभागालासुद्धा आहे. पण या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sophisticated Texture Exotic Alcohol Liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.