सोनी हत्याकांड : जलदगती न्यायालयात १५ पासून सुनावणी
By Admin | Updated: September 2, 2014 23:30 IST2014-09-02T23:30:15+5:302014-09-02T23:30:15+5:30
तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची सुनावणी १५ सप्टेंबरला सुरू होणार आहे. याप्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करतील. याप्रकरणासाठी सरकारी

सोनी हत्याकांड : जलदगती न्यायालयात १५ पासून सुनावणी
भंडारा : तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची सुनावणी १५ सप्टेंबरला सुरू होणार आहे. याप्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करतील. याप्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त झाल्यानंतर अॅड.निकम हे सोमवारला भंडारा जलदगती न्यायालयात वकीलपत्र सादर केले. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. येनुरकर यांच्या न्यायालयात चालणार आहे.
८०० पानांचे आरोपपत्र
सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी या प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल सादर करायचे आहेत. सोमवारला न्यायालयात आरोपपत्रासोबत अन्य आवश्यक कागदपत्रे १५ सप्टेंबरच्या पूर्वी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारला सुनावणी दरम्यान पोलिसांनी शाहनवाज ऊर्फ बाबू शेख (२२), महेश आगाशे (२६), सलीम पठाण (२४), राहुल पडोळे (२२), केसरी ढोले (२२) रा.तुमसर, सोहेल शेख (२६), रफीक शेख (४२) रा.नागपूर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
काय आहे प्रकरण
तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल या तिघांचा २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.
मुलीने घेतली अॅड.निकम यांची भेट
या हत्याकांडात बचावलेली संजय सोनी यांची मुलगी हीरल ही न्यायालयात आली होती. त्यापूर्वी विश्रामगृहात तिने अॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
(जिल्हा प्रतिनिधी)