सोनी हत्याकांडाची सुनावणी एप्रिल महिन्यात सुरू होणार
By Admin | Updated: March 18, 2015 00:46 IST2015-03-18T00:46:30+5:302015-03-18T00:46:30+5:30
येथील सराफा व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणाची ट्रायल (सुनावणी) भंडारा येथील फास्ट ट्रॅक कोर्टात...

सोनी हत्याकांडाची सुनावणी एप्रिल महिन्यात सुरू होणार
तुमसर : येथील सराफा व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणाची ट्रायल (सुनावणी) भंडारा येथील फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम येथे आपला पक्ष मांडणार आहेत. तत्पूर्वी २७ मे २०१४ ला पोलिसांनी तुमसर न्यायालयात ८०० पानांचे सात आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बहुचर्चित तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते.
२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा दु्रमिल या तिघांची हत्या सात दरोडेखोरांनी केली होती. २७ फेब्रुवारी रोजी आरोपीविरूद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खूनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरीता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे व २०१ पुरावे नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात एकूण ९ कोटी ९ लाख रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणात फाशीची शिक्षेची कलमे आहेत. हा तिहेरी खून खटला जलद न्यायालयात आहे. पोलिसांनी सर्व सोपस्कर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले आहे. ८०० पानांच्या आरोपपत्रात सर्व पुरावे, साक्ष, मुद्देमाल, साहित्य, ओळख याची जुळवाजुळव करण्यात आली.
एप्रिल महिन्यात हा खटला भंडारा येथील जलद न्यायालयात सुरू होत आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तशा तारखा सुनावणी करीता दिल्या आहेत. प्रथम निकम आपला पक्ष न्यायालयात मांडणार आहेत.पुढील तीन ते चार महिन्यात या खटल्याचा निकाल येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुर्मिळातल्या दुर्मिळ खटल्यात फाशीची शिक्षा सुनाविण्यात येते. सोनी कुटूंबातील तिघांची हत्या अत्यंत निर्दयतेने सात आरोपींनी केली होती. विशेष सरकारी वकील उज्वल निकम भंडारा कोर्टात खटल्याकरिता दुसऱ्यांदा येत आहेत. प्रथम ते देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणी आले होते. (तालुका प्रतिनिधी)