सोनी हत्याकांडाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात
By Admin | Updated: August 30, 2014 23:26 IST2014-08-30T23:26:07+5:302014-08-30T23:26:07+5:30
येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याच्या प्रथम

सोनी हत्याकांडाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात
न्याय लवकर मिळण्याची अपेक्षा : उज्ज्वल निकम येणार भंडाऱ्यात
तुमसर : येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याच्या प्रथम सुनावणीकरिता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम दि. १ सप्टेंबर रोजी भंडारा येथे येत आहेत. महाराष्ट्र शासनाने या खटल्याकरिता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.
दि. २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमील या तिघांची सात दरोडेखोरांनी हत्या केली होती.
या हत्याकांडात सहभागी असलेले शाहनवाज ऊर्फ बाबू सलार शेख (२२) रा.तुमसर, महेश आगाशे (२६), सलीम नजीर खान पठाण (२४), राहुल पडोळे (२२), केसरी ढोले (२२) (सर्व राहणार तुमसर), सोहेल शेख (२६), रफीक शेख (४२) रा. नागपूर या सात आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली होती.
आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, ३९६, ४४९, १२०, २०१ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तुमसर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात ३९ लाख ५ हजार रोख, ८.३९४ किलोग्रॅम सोने किंमत १ कोटी ६५ लक्ष चांदी ८४२ ग्रॅम किंमत १९ हजार ५०० दोन दुचाकी ७० हजार असे एकूण २ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला होता.
दि. २८ मे रोजी तुमसर न्यायालयात ८०० पानांचे आरोपपत्र तुमसर पोलिसांनी दाखल केले होते. बहुचर्चित तिहेरी हत्याकांड राज्यभरात जागले होते. हत्याकांडाची भीषणता लक्षात घेऊन राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तीन महिन्यानंतर आरोप दाखल झाल्यानंतर ट्रायल दि. १ सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
असे आहे प्रकरण
सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांची गळा आवळून सात दरोडेखोरांनी निर्घृण हत्या केली. दि. २६ फेब्रुवारी रोजी संजय सोनी हे शाहनवाज सलार शेख या वाहनचालकासोबत गोंदिया येथे व्यवसायानिमित्त गेले होते. रात्री परतीच्या वेळी तिरोडाजवळील विहिरगाव शिवारात चालकाने कार थांबविली. तिथे सहा आरोपी दोन दुचाकी घेऊन वाट पाहत होते. कारचा इंडिकेटर दाखविताच ते धावत येऊन कारमध्येच संजय सोनी याचा गळा आवळून खून केला. संजयचा मृतदेह घेऊन हे सात आरोपी त्यांच्या घरी आले. घरी उर्वरीत रक्कम व सोने जमा करून या दरोडेखोरांनी संजय यांची पत्नी पुनम व मुलगा दु्रमिल या दोघांचाही गळा आवळून खून केला. सातही आरोपी फरार झाले. काटेबाम्हणी येथील शेतात सोन व रोख रकमेचे वाटप केले. चार आरोपी तुमसर तर तीन आरोपी रामटेक भंडारा मार्गे नागपूरकडे फरार झाले होते.