सोंड्याटोला प्रकल्पाचा मुद्दा चिघळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:18 IST2016-07-23T01:18:30+5:302016-07-23T01:18:30+5:30
तुमसर तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन योजना बंद आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही.

सोंड्याटोला प्रकल्पाचा मुद्दा चिघळणार
आंदोलन ३० रोजी : शिवसेनेने दिला अल्टीमेटम
भंडारा : तुमसर तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन योजना बंद आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. विद्युत देयकाचा भरणा न केल्याने राजकीय पक्षांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला ऐरणीवर आणले आहे. यासंबंधी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी ३० जुलै रोजी सिहोरा येथे आंदोलाचा इशारा दिला आहे.
वारंवार सांगूनही प्रशासनीक अधिकारी शेतकऱ्यांच्या मुद्याकडे लक्ष देत नाही. विज देयक भरून बुधवारपर्यंत प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले असले तरी शिवसेनेने २९ पर्यंत प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान आंदोलनापुर्वी सोंड्याटोला उपसा सिंचन योजना सुरू झाला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती आहे. धानाला भाव नाही, प्रत्येक एकरी पाच ते दहा पोते धानाचे उत्पादन होत आहे.
शासन आणेवारीच्या भरोशावर शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसूली केली जाते. मात्र शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नाही.
धानाला भाव तीन हजार रूपये देण्यात यावा ही फार जुनी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोफत विद्युत पुरवठा, नि:शुल्क खतपुरवठा, किटकनाशके तसेच मनरेगा अंतर्गत मजुर उपलब्ध करून द्यावे, या प्रश्नावरही शासन गप्प आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे विद्युत बिल भरून योजना कार्यान्वीत करण्यात यावी अथवा प्रशासनाने आंदोलनाला समोरे जावे, असा इशारा राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)