तुमसर: घरगुती वादातून मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. रुग्णालयात उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिलक वॉर्डात घडली. राजेश बंधाटे (४५) रा. देव्हाडी असे मृताचे नाव तर मारेकरी मुलाचे नाव रोहित बंधाटे (२३) असे आहे. या घटनेने देव्हाडीत एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार, शनिवारी वडील राजेश हे मद्य प्राशन करून घरी आले. त्यानंतर त्यांनी घरातील भांडी रस्त्यावर फेकली. दरम्यान रोहित घरी आल्यावर त्याला हा प्रकार दिसला. याबाबत त्याने वडिलांना हटकले. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. रागाच्या भरात घरातील लोखंडी पाईप (चुलीची फुंकर) रोहितने वडिलांच्या डोक्यात मारली व त्यांना धक्का दिला. यात वडील राजेश घरासमोरील सिमेंट रस्त्यावर पडले. राजेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेची माहिती देव्हाडी पोलीस चौकीला देण्यात आली. परिसरात एकच बघ्यांची गर्दी जमा झाली. राजेश यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फिर्यादी शांता शामराव बंधाटे यांच्या तक्रारीवरून रोहित बंधाटे याला तुमसर पोलिसांनी अटक करून भादंवि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटना स्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गभने, पोलीस शिपाई जितू मल्होत्रा करीत आहेत.