समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान

By Admin | Updated: August 14, 2015 00:06 IST2015-08-14T00:06:31+5:302015-08-14T00:06:31+5:30

तळागाळातील लोकांची कामे शासकीय कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित विस्तारित समाधान योजना शिबीर हे वरदान ठरत आहे.

Solution Camp boasts for general public | समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान

समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान

पवनी येथे महाराजस्व अभियान : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
भंडारा : तळागाळातील लोकांची कामे शासकीय कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित विस्तारित समाधान योजना शिबीर हे वरदान ठरत आहे. समाजाची आणि सर्वसामान्य माणसाची सेवा हिच ईश्वर सेवा समजून प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम करावे व लोकांना दिलासा दयावा, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. पवनी येथे तहसिल कार्यालयासमोरील पर्यटन संकुलात आयोजित महाराजस्व अभियानात आ. अवसरे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती अर्चना वैद्य, नगराध्यक्ष रजनी मोटघरे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार राचेलवार, पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. अवसरे म्हणाले, समाधान शिबीराच्या माध्यमातून सर्व विभागाचा समन्वय होत असल्याने सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील अधिकारी लोकांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडवत आहेत, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी धीरज कुमार म्हणाले, जो पर्यंत शेतकरी, शेतमजूर यांचे समाधान होत नाही तो पर्यंत गावाचा, राज्याचा व देशाचा विकास होणार नाही.
लोकांना छोट्या कामासाठी जिल्हास्तरावर हेलपाटे घ्यावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या शिबीरामार्फत उपलब्ध करुन दिली आहे. सर्व विभागांनी एकत्र येवून जनतेच्या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे. लोकांपर्यंत शासन पोहचले पाहिजे अशा पध्दतीने काम करावे, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर म्हणाले, पुर्वी पेक्षा शासनाच्या कार्यपध्दतीत आमुलाग्र बदल झाला आहे. त्याचबरोबर शासन लोकाभिमुख होत असून जनतेच्या जगण्यामध्ये शासनाची महत्वाची भूमिका आहे. शासकीय यंत्रणेच्या मानसिकतेमध्ये सुध्दा बदल होत असून यात लोकसहभागाची अपेक्षा आहे. कारण कोणताही विकास लोकसहभागा शिवाय शक्य नाही.
यावेळी नगराध्यक्ष रजनी मोटघरे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. या समाधान शिबीरामध्ये १७ विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले होते. तसेच लाभार्थ्यांना दाखले, धनादेश, एलपीजी गॅस इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. कृषि अधिकारी कार्यालयामार्फत पॅक हाऊससाठी शेतकऱ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. नगर परिषद पवनीतर्फे रमाई आवास योजनेतील ६ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत सायकल आणि सोलर कंदिलाचे वाटप करण्यात आले. जिल्हा ग्रामीण यंत्रणेमार्फत १० बचत गटांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत आदिवासींना एलपीजी गॅसचे वितरण करण्यात आले. मत्स्य विभाग, महावितरण, पशुसंवर्धन, महसूल विभागामार्फत दाखले, उपप्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग यांच्या मार्फत सुध्दा दाखले तसेच धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, नगर परिषद पवनीचे मुख्याधिकारी देवळीकर तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. या शिबीरात लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून योजनांचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Solution Camp boasts for general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.