वृध्द दाम्पत्याला काठीने मारहाण
By Admin | Updated: April 8, 2015 00:46 IST2015-04-08T00:46:49+5:302015-04-08T00:46:49+5:30
शेतातील झाडाचे मोहफुल वेचू नका, यावरुन झालेल्या भांडणात एका तरुणाने वृध्द दाम्पत्याला काठीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले...

वृध्द दाम्पत्याला काठीने मारहाण
भीतीपोटी गाव सोडले : गुन्हा दाखल
तुमसर : शेतातील झाडाचे मोहफुल वेचू नका, यावरुन झालेल्या भांडणात एका तरुणाने वृध्द दाम्पत्याला काठीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणात पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. जिवानिशी मारण्याची धमकी दिल्याने या दाम्पत्यांवर गाव सोडून जाण्याची पाळी आली आहे. त्यामुळे हे दाम्पत्य तुमसर येथे मुलाकडे आले आहे.
दसाराम कुकडे (७०) व पत्नी कमला कुकडे (६५) रा.केसलवाडा हे दोघे शेतातील मोहफूल वेचण्याकरिता सकाळी ६ वाजताच्या सुमारास गेले होते. रामदास कुकडे (३०) याने मोहफुले वेचण्यासाठी मज्जाव केला. त्यानंतर रामदासने शिवीगाळ करीत वाद घातला. त्यानंतर त्याने दसाराम व पत्नी कमला यांना मारहाण केली. यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. केसलवाडा हे गाव तुमसर-तिरोडा सीमेवर आहे. परंतु पोलीस ठाणे तिरोडा येत असल्यामुळे हे दाम्पत्य तक्रार देण्याकरिता गेले असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. घरी परतल्यावर रामदासने त्यांच्या घरी जाऊन जिविनिशी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हे भयभीत वृध्द दाम्पत्य गाव सोडून तुमसर येथील मुलाकडे आले. यापूर्वी ८ जुलै २०१२ मध्ये रामदासने मारहाण केली होती. त्यावेळीही अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. आतासुध्दा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची चौकशी करुन आरोपीला अटक करण्याची मागणी या दाम्पत्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्र्रकरणात आपण स्वत: लक्ष घालणार आहे.
- वसंत लदे,
पोलीस निरीक्षक, तिरोडा