वृक्षाची फांदी कोसळल्याने सोलरपंप निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:10 IST2019-02-01T22:09:44+5:302019-02-01T22:10:03+5:30
संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : भारनियमन, वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा आणि वेळेवर देयकाचा भरणा होत ...

वृक्षाची फांदी कोसळल्याने सोलरपंप निकामी
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भारनियमन, वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा आणि वेळेवर देयकाचा भरणा होत नसल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत होती. यावर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सोलरपंप कार्यान्वित करण्यात आली. मात्र पॅनलवर सावली येत असल्याने वृक्ष तोडताना मोठी फांदी पॅनलवर पडली आणि ही यंत्रणा निकामी झाली. परिणामी पुन्हा गावकऱ्यांना विजेचा वापर करुन पाणीपुरवठा सुरु झाला. हा प्रकार आहे साकोली तालुक्यातील कुंभली ग्रामपंचायतीचा.
कुंभली येथे ग्रामपंचायती अंतर्गत पाणीपुरवठा योजना आहे. विजेवर आधारित ही योजना कार्यान्वित होती. मात्र गावातून कर वसूली होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडत असल्याने पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली होती. त्यातच भारनियमन आणि खंडीत वीज पुरवठा फटका या योजनेला बसत होता. अनेकदा तर १५ ते २० दिवस पाणीपुरवठा बंद राहिला. त्याचा महिलांना सर्वांना त्रास सहन करवा लागला. यावर मात करण्यासाठी सोलरपंप योजना पुढे आली. योजनेअंतर्गत ७६ हजार ९६३ रुपये किंमतीचे सोलर पॅनल बसविण्यात आले. त्यावरुन गावाला पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. आता आपल्याला सुरळीत आणि योग्य वेळी पाणी मिळले अशी अपेक्षा होती.
मात्र काही दिवसात सोलर पंपला घरघर लागली. तीन चार महिन्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पॅनलवर सावली येत होती. त्यामुळे हे यंत्रणा पाहिजे तेवढी प्रभावी ठरत नव्हती. त्यामुळे कोणतीही परवानगी न घेता येथील झाडे कापण्यात आली. परंतु झाडे कापताना खबरदारी न घेतल्याने एक मोठी फांदी या पॅनलवर पडली आणि पॅनल फुटले. त्यामुळे ही योजनाच आता निकामी झाली.
पॅनल दुरुस्तीचा खर्च लाखोचा घरात आहे. आणि ग्रामपंचायत हा खर्च करण्यास सक्षम नाही. त्यामुळे शेवटी ही योजना पूर्ववत पुन्हा विजेवरच कार्यान्वित करण्यात आली आहे.
चौकशीची गरज
सोलर पंपच्या बाजुला असलेल्या वृक्षांची कत्तल कुणी केली. वृक्ष तोडतांना काळजी का घेतली नाही. पंपाचे पॅनल कसे फुटले, याची चौकशी होण्याची आता गरज आहे.