१९५ जणांना मिळणार सौर कृषिपंप

By Admin | Updated: December 6, 2015 00:28 IST2015-12-06T00:28:43+5:302015-12-06T00:28:43+5:30

भारनियमनामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली.

Solar farming will be available to 195 people | १९५ जणांना मिळणार सौर कृषिपंप

१९५ जणांना मिळणार सौर कृषिपंप

अनिल गेडाम यांची माहिती : शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही
भंडारा : भारनियमनामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली. यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून यावर्षी जिल्ह्यातील १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांनी दिली.
या योजनेचा लाभ ५ एकर पेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजिकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर सौर पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे.
या सौर पंपामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज राहणार नाही. लोडशेडिंग पासून मुक्तता मिळणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिवसा ८ ते १० तास वीज पुरवठा उपलब्ध राहील. सौर पंपाची निगा व दुरुस्ती पाच वर्ष कंपनीतर्फे करण्यात येईल.
महाराष्ट्रामध्ये ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये व अतिदुर्गम भागामध्ये राबविली जाणार आहे. यामध्ये केंद्रशासनाचे ३० टक्के वित्तीय अनुदान असून राज्य शासनाचे ५ टक्के हिस्सा राहील. उर्वरीत ६५ टक्के रकमेपैकी लाभार्थीचा हिस्सा कमीत कमी ५ टक्के ठेवण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कर्जाची परतफेड महावितरण कंपनीद्वारे टप्पा टप्प्याने करण्यात येईल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार लाभार्थी निवड जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Solar farming will be available to 195 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.