मातीचा ढिगारा कोसळून मजूर ठार
By Admin | Updated: May 10, 2014 02:23 IST2014-05-09T23:54:46+5:302014-05-10T02:23:53+5:30
रस्त्यावरील पुलाच्या कॉलमचे खड्डे जेसीबीच्या सहायाने खोदत असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला.

मातीचा ढिगारा कोसळून मजूर ठार
लाखनी : रस्त्यावरील पुलाच्या कॉलमचे खड्डे जेसीबीच्या सहायाने खोदत असताना मातीच्या ढिगार्याखाली दबून एका ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. तसेच एक मजूर गंभीर जखमी झाला. मनोहर शिवराम धुर्वे रा.सिपेवाडा असे मृत मजुराचे नाव असून जखमीचे नाव मोहन नारायन शेंडे ४५ रा.रोहणा असे आहे. ही घटना शुक्रवारी, सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास सिपेवाडा-लाखनी मार्गावरील निर्माणाधीन सिपेवाडा गावाजवळ घडली. सिपेवाडा पुलाच्या बांधकामावर जवळपास १५ दिवसांपासून २० मजूर काम करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधकामाचे टेंडर चकोले कंस्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. पुलाच्या दोन्ही भागावर मातीकाम करण्यासाठी पाच मजूर काम करीत होते. जेसीबी मशीनीद्वारे माती खोदूर उंच ठिकाणी माती ठेवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान खालच्या बाजुला उभे असलेल्या मनोहर धुर्वे व मोहन शेंडे यांच्यावर मातीचा उंच ढिगारा अंगावर कोसळला. यात धुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला तर शेंडे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुलाचे बांधकाम करताना निकषाचे पालन करण्यात आले नाही त्यामुळेच एका मजुराला प्राणाला मुकावे लागले, असा आरोप होत आहे. जोपर्यंत कंत्राटदार व अभियंता ग्रामीण रुग्णालयात येणार नाहीत तोपर्यंत शवविच्छेदन होवू देणार नाही, अशी भूमिका मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. वृत्त लिहीपर्यंत ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी जमली असून शवविच्छेदन झालेले नव्हते. मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच सुनेल कहालकर व तेजराम धुर्वे यांनी केली आहे. मनोहरचे मागीलवर्षी लग्न झाले असून त्यांची पत्नी गर्भवती आहे. कमावत्या मनोहरच्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्याच्या जाण्याने धुर्वे कुटुंबीयावर संकट कोसळले आहे. (तालुका प्रतिनिधी) याच निर्मानाधिन कॉलममध्ये मातीच्या ढिगार्यात दबून मनोहर धुर्वे या मजूराचा मृत्यू झाला.