सुपीक मातीवरही तस्करांची नजर
By Admin | Updated: December 4, 2014 23:02 IST2014-12-04T23:02:47+5:302014-12-04T23:02:47+5:30
जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांचीही नजर आता या गौणखनिजांवर पडली आहे. भंडारा शहरालगतच्या वैनगंगा नदी पात्रातील सुपीक मातीची वाहतूक केली जात आहे.

सुपीक मातीवरही तस्करांची नजर
वैनगंगेचे पात्र विस्तारतेय : सकाळपासून सुरू होते वाहतूक, जिल्हा प्रशासन अनभिज्ञच
भंडारा : जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांचीही नजर आता या गौणखनिजांवर पडली आहे. भंडारा शहरालगतच्या वैनगंगा नदी पात्रातील सुपीक मातीची वाहतूक केली जात आहे. रेतीची अवैध वाहतुकीवर लगाम लावण्यात प्रशासनाला काहीअंशी यश आले असताना आता विनापरवानगीने तस्करांची नजर आता मातीच्या खणनावर गेली आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला सुपीक भुभाग लाभला आहे. जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या भरोश्यावर बारमाही पिकेही घेतली जातात. वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्याला वळसा घालुन वाहते. त्यामुळे या नदीपात्रात वाळूच्या रूपाने अमूल्य देणगी या जिल्ह्याला मिळाली आहे. तेवढीच सुपीक जमीनही नदीकाठावर आहे. परिणामी प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या व शासकीय मालमत्ता असलेल्या या जमीनीवरील मातीचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे.
वैनगंगानदी काठावरील हिंदु स्मशानभूमी ते पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटर परिसरातून तस्करांनी मातीचे खनन करायला सुरूवात केली आहे. यासाठी नदीकाठावर जाण्यासाठी कच्चा रस्ताही तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्टर थेट नदीकाठापर्यंत नेण्यात येते. मजुरांच्या साह्याने नदीकाठावरील सुपीक मातीचे खणन करून ट्रॅक्टर टालीत भरण्यात येते. सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मातीचे सर्रास खणन करून त्याचे वहण केले जाते. ही माती घरबांधकामासाठी अथवा एखादे ले-आऊट समतल करण्यासाठी वापरली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. महिनाभरापूर्वी रेती तस्करांनी महसुल प्रशासनाच्या डोळ्यादेखत रेतीची लुट चालविली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रेती तस्करांवर लागम लावण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली. यात जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात महसुलही प्रशासनाच्या तिजोरीला मिळाला होता. विशेष म्हणजे इथेही रेती तस्करांनी शक्कल लढविली होती. दुसऱ्याच्याच नावाने जप्तीची वाळू विकत घेतला. ‘‘चोर पे मोर’’ चा प्रत्यय या ठिकाणी आला. मात्र ‘लिगल’ कारवाई झाल्याने कुणीच बोलले नाही. त्याचक्षणी मातीच्या खणन करण्यावरही खुसफुस सुरू झाली होती. फुकटच्या सुपीक मातीवर कुणाची तरी वाईट नजर गेलीच. (प्रतिनिधी)