शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचे साकडे
By Admin | Updated: November 27, 2014 23:28 IST2014-11-27T23:28:08+5:302014-11-27T23:28:08+5:30
येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचे साकडे
भंडारा : येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.
माहितीनुसार मागील सत्रात येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकाची बदली झाली. त्यानंतर या ठिकाणी विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नियमितरित्या वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जुलै महिन्यापासून विज्ञान विषयासंदर्भात विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन हव्या त्या प्रमाणात झालेले नाही. विज्ञान विषय पुरेशा प्रमाणात न शिकविता प्रथम सत्रांत परीक्षा दिवाळीपूर्वी घेण्यात आली. शाळेत विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यामुळे सत्रांत परीक्षेतील पेपर अजूनपावतो तपासणी करून परत मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेंशन बळावले आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार शाळेचे मुख्याध्यापक तथा अन्य शिक्षकांना माहिती दिली. मात्र शिक्षण विभागामार्फत शिक्षकाची सोय करण्यात आली नाही. त्याचा फटका येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. दहावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून एका दृष्टीकोणातून बघितले जाते. विज्ञान विषयासारख्या महत्वपूर्ण विषयासाठी शिक्षक नसणे ही बाब विद्यार्थ्यांसाठी गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे शिक्षक नसल्यामुळे दहाव्या वर्गातील काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान विषयातच नापास झाले असल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता महत्वाची भूमिका वठविण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार कळवूनही शिक्षण विभाग या गंभीर विषयाकडे गांभीर्याने बघत नाही काय? असा सवाल येथील विद्यार्थ्यांनी केली आहे. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची विणवणी कायम असून याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने बघणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)