मुरुम, सुपीक जमिनीवरही तस्करांची नजर
By Admin | Updated: October 15, 2015 00:36 IST2015-10-15T00:36:59+5:302015-10-15T00:36:59+5:30
साकोली तालुक्याला गौण खनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांची नजर आता या गौण खनिजावर पडली आहे.

मुरुम, सुपीक जमिनीवरही तस्करांची नजर
फिरते पथक नावापुरतेच : रात्रंदिवस सुरु राहते सर्रास वाहतूक, दिवसाकाठी बुडतोय लाखोंचा महसूल
संजय साठवणे साकोली
साकोली तालुक्याला गौण खनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांची नजर आता या गौण खनिजावर पडली आहे. साकोली तालुक्यातील तलाव, बोडी, नदीपात्रातील सुपीक माती व जंगलातील व पहाडीवरील मुरुमाची खुलेआम वाहतूक केली जाते. रेतीची अवैध वाहतुकीवर काहीअंशी लगाम लावण्यात प्रशासनाला यश आले तरी विनापरवाना तस्करांचीही नजर आता माती व मुरुमावर गेली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या फिरते पथकाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका विविधतेने नटलेला असून जंगल व पहाडीचे मोठे क्षेत्र तालुक्याला लाभले आहे. चुलबंद नदीच्या भरवशावर बारमाही पिके घेतली जातात. या नदीचे पात्र साकोली तालुक्यातून जात असल्यामुळे नदीपात्रात वाळूच्या रुपाने अमुल्य देणगी या तालुक्याला लाभली आहे. तेवढीच सुपिक जमीन नदीकाठावर, तलाव, बोडी, पहाडी व जंगलात मुरुमही उपलब्ध आहे. प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या या महसुली जमिनीवरील माती व मुरमाचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे.
नागझिरा मार्गावरील तलावापासून गडकुंभलीच्या पहाडीतून नेहमीच माती व मुरुमाचे खणन सुरु असते. हे खणन जेसीपीच्या सहाय्याने करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली जाते. ही अवैध वाहतूक रात्री व पहाटे केली जाते. ही माती व मुरुम नवीन घरबांधणीसाठी व नवीन लेआऊटसाठी वापरण्यात येत असून यासाठी कुठलीही परवानगी घेतली जात नाही.
यासाठी महसूल विभागाने फिरते पथकाची व्यवस्था केली असून यात मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस यांची नेमणूक केली असली तरी हे पथक दिवसा फिरतात व रात्री कुठे जातात कळत नाहीत. परिणामी अवैध खणन करणाऱ्यांना संधी मिळत असल्यामुळे याचा फायदा घेत सर्रास चोरी होते. यामुळे शासनाचा दिवसाकाठी लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.