विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’
By Admin | Updated: October 25, 2015 00:33 IST2015-10-25T00:33:41+5:302015-10-25T00:33:41+5:30
शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो.

विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’
चौकांना अतिक्रमणाचा विळखा : बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यक
भंडारा : शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसाठी चौक हेच मार्गदर्शक असतात. म्हणूनच की काय चौकातील वाहतूक व्यवस्था, सौंदर्यीकरण, मार्गांची माहिती दर्शनीय भागात दिसेल असे फलक, पुतळ्यांची स्थिती आणि तेथील दृष्यबाबी त्यावर प्रभाव पाडत असतात. मात्र भंडारा शहरातील चौक यातील कोणतेही निकष पूर्ण करताना दिसत नाही. चौकात ट्रॅफिक सिग्नलचा बोजवारा आहे. एकाही चौकात हिरवळीचा लवलेश नाही. वाहतूक नियमावली दर्शविणारे चिन्ह चौकातून गायब आहेत, चौकात रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक आढळत नाही. मात्र जाहिरातींच्या फलकांनी चौकांचे विद्रुपीकरण झालेले दिसते. चौकांचे असेच विद्रुपीकरण सुरू राहिले तर या शहराला ‘स्मार्ट लूक’ कसा येणार, यावर विचार करण्याची गरज आहे.
जाहिरातींचा ओंगळवाणा बाजार
शहरातील चौकांमध्ये जाहिरात फलकांचा बाजार किळसवाणा होत चालला आहे. राजकीय पदाधिकारी, कंपन्या, दुकानांच्या जाहिरात फलकांनी चौक भरून आहेत. यामुळेच नियम फलक व रस्त्यांची माहिती देणारे आवश्यक फलक लावायला जागा उरली नाही. या जाहिरातबाजीवर प्रशासनाचेही नियंत्रण राहिले नसल्याने हा ओंगळवाणा प्रकार फोफावला आहे. यामुळे चौकांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. चौकांना स्मार्ट स्वरूप द्यायचे असेल तर या विद्रुपीकरणाला आळा घालणे आवश्यक झाले आहे.
वाहतुकीचा गोंधळ
चौकात शिस्तीचा अभाव असल्याने शहरातील जवळपास सर्वच चौकात वाहतुकीचा गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळते. मुख्य चौकातील महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची आहे. आॅटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत असतात. यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष राहिले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोर जावे लागते. चौकात जड वाहने, कार आणि दुचाकी कशाही पद्धतीने उभ्या राहतात. वाहतुकीचा हा गोंधळ सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)