लहान व्यवसाय देशोघडीला
By Admin | Updated: May 13, 2014 23:19 IST2014-05-13T23:19:34+5:302014-05-13T23:19:34+5:30
उद्योगधंद्याच्या विकासामुळे अनेक लहान व्यावसायिकांचे व्यवसाय देशोधडीला लागले. त्यामध्ये लोहार, खाती, घिसाडी, गाडीलोहार या समाजाचा व्यवसाय शेवटची घटका मोजत ....

लहान व्यवसाय देशोघडीला
कोंढा (कोसरा) : उद्योगधंद्याच्या विकासामुळे अनेक लहान व्यावसायिकांचे व्यवसाय देशोधडीला लागले. त्यामध्ये लोहार, खाती, घिसाडी, गाडीलोहार या समाजाचा व्यवसाय शेवटची घटका मोजत असून या समाजावर काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. पवनी तालुक्यात सर्वत्र लोहार व खाती समाज आढळतो. भंडारा जिल्ह्यात अनेक गावात लोहार, खातीचे जातीचे घरे दोन ते चार असे आहेत. या समाजाचे लोक शेतीसाठी अवजारे तयार करतात. लोखंड व लाकडी काम करून दिवसभर झाडाखाली किंवा झोपडी बांधून अग्नीला साक्षी ठेवून लोखंडाची कामे करतात. पोटाची खडगी भरण्यासाठी लोखंडाचे कामे करीत शेतकर्यांना शेती व घरगुती अवजारे पुरविण्याचे काम या समाजाचे आहे. औद्योगिक विकास झाल्याने शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शेतीसाठी लागणारे अवजारे ग्रामीण भागातदेखील दुकानात मिळत आहेत. शेतकरी कारखान्यातील अवजारे खरेदी करीत असल्यामुळे लोहार व खाती जातीवर उपासमार आली आहे. आज खेड्यात कुर्हाडी, फासा, विळे, कढई, तावा बनविण्याचे काम लोहार, खाती करीत आहेत. पण हे साहित्य बनवून त्यांना बाजारात विकण्यास बसावे लागते. दोन तीन ग्राहक मिळाले तर ठीक. अन्यथा घरी परत यावे लागते. खाती, लोहार, व्यवसाय अखेरची घटका मोजत आहेत. फक्त खाती लोहारांना अवजारांना धार लावणे व तुटलेले लोखंडाचे सामान जोडणे एवढेच काम शिल्लक आहे. हा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. खाती लोहार जातीमधील शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी आहे. १ मार्च २00६ पासून महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीत लोहार, खाती यांचा समावेश केला. परंतु आरक्षणाचा फायदा या जातीला मिळत नसल्याचे चित्र आहे. भटक्या जाती-जमातीमध्ये शासनाने अ,ब,क,ड असे ४ गट पाडले. त्यांना महाराष्ट्रात ११ टक्के आरक्षण दिले, पण हे आरक्षण भरताना क, ड यांना जास्त प्राधान्य मिळत आहे. भटक्या जाती व जमातीत अ व ब या गटांना अन्याय होत आहे. त्यामुळे खाती, लोहार समाज अंधाराच्या खाईत लोटत आहे. या समाजातील लोकांजवळ शेती नाही. आहे ती अल्प प्रमाणात त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. शासनाने या जातीच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)