रेतीघाटावर कंत्राटदारांना मोकळे रान
By Admin | Updated: February 24, 2017 00:34 IST2017-02-24T00:34:38+5:302017-02-24T00:34:38+5:30
चारगाव देव्हाडी रेती घाटातून नियमबाह्य रेती उत्खनन सर्रास सुरू आहे. महसूल कंत्राटदार तथा खनिकर्म विभागाचे

रेतीघाटावर कंत्राटदारांना मोकळे रान
चारगाव येथील प्रकार : महसूल खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष
तुमसर : चारगाव देव्हाडी रेती घाटातून नियमबाह्य रेती उत्खनन सर्रास सुरू आहे. महसूल कंत्राटदार तथा खनिकर्म विभागाचे संगनमतामुळे लाखोंचा महसूल येथे बुडत आहे.
वैनगंगा नदीच्या चारगाव देव्हाडी रेती घाट उच्च दर्जाच्या रेती करिता प्रसिद्ध आहे. या रेतीघाटाचा तीन ते चार कोटीत महसूल विभागाने लिलाव केला. तुमसर-भंडारा-गोंदिया राज्य मार्गाशेजारी हा रेती घाट आहे. चारगाव ते भंडारा असा रस्ता आहे. भंडारा शहराजवळील दाभा येथे हा रस्ता निघतो. आडमार्गाने येथे रेतीची वाहतूक करण्यात येते.
माडगी-देव्हाडा शिवारातील वैनगंगा नदी पुलावरून चारगाव रेती घाटात दोन जेसीबी व पोकलॅन्ड मशीन रेती उत्खनन करतानी दिसतात. अनेक मोठे अधिकारी व लोकप्रतिनिधी येथून मार्गक्रमण करतात, परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जात आहे.
चारगाव नदी घाटात सिमांकन केल्याचे दिसत नाही. महसूल विभागाचा किमान एक कर्मचारी मोठ्या नदी घाटावर नियमित कर्तव्यावर ठेवणे आवश्यक आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. घाटाच्या सीमा कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती येथे भेट दिल्यावर कळत नाही.
कारवाई होऊ नये म्हणून साळी रेती उत्खनन सुरू करण्यात येते. दुपारनंतर ती बंद होते, पुन्हा दुपारी चार नंतर रेती उत्खनन सुरू करण्यात येते. येथे कंत्राटदाराने स्थानिक एका युवकाला हाताशी घेतले तोच सर्व सांभळीत असल्याची माहिती आहे. महसूल अधिकारी येण्याची खडानखडा माहिती येथे ते येण्यापूर्वीच प्राप्त होते. तुमसर तालुक्यातील प्रत्येक रेतीघाटावर नियमबाह्य यंत्राने रेती उत्खनन सुरू आहे.
लिलावात ठळक मोठ्या अक्षरात यंत्राने रेती उत्खननास बंदी असल्याचे महसूल विभाग नमूद करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र उलटे चित्र रेती घाटावर दिसून येत आहे.
यासंदर्भात तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना सांगितल्यावर मी बघतो एवऐच ते बोलले, कंत्राटदार की रेतीघाट यापैकी कुणाला बघतात हे पाहणे औसुक्याचे येथे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)