रेतीघाटावर तस्करांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:09 IST2018-11-03T22:08:55+5:302018-11-03T22:09:20+5:30
तालुक्यात रेती चोरांवर पोलीस, महसूल व भंडारा पोलिसांनी निगराणी वाढविल्यानंतर आता रेती तस्करांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील मात्र मोहाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ढोरवाडा रेतीघाटाकडे वळविला असून गत पंधरा दिवसांपासून रोज पहाटे आठ ते दहा ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेती नदीकाठावर काढून चारगाव, देव्हाडी रस्त्यालगत रेतीची डम्पींग केली जात आहे.

रेतीघाटावर तस्करांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यात रेती चोरांवर पोलीस, महसूल व भंडारा पोलिसांनी निगराणी वाढविल्यानंतर आता रेती तस्करांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील मात्र मोहाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ढोरवाडा रेतीघाटाकडे वळविला असून गत पंधरा दिवसांपासून रोज पहाटे आठ ते दहा ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेती नदीकाठावर काढून चारगाव, देव्हाडी रस्त्यालगत रेतीची डम्पींग केली जात आहे. नंतर ही रेती नजीकच्या गावातील गरजू लोकांना ट्रॅक्टरद्वारे पोहचविली जाते किंवा टिप्पर, ट्रक द्वारे नागपुरला रवाना केली जात आहे. प्रशासनातील अधिकारी मुद्दामहून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
मोहाडी तालुक्यातील रोहणा, बेटाळा, रोहा, मोहगाव (देवी), पाचगाव, नेरी या घाटावरून रेती चोरी करण्यात येते. मात्र या घाटाकडे महसूल व पोलीस विभागाचे लक्ष असल्याचे रेती चोरांना या घाटातून रेती चोरी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून आता रेती तस्करांनी आपला मोर्चा ढोरवाडा रेती घाटाकडे वळविला आहे. पहाटे पाच ते सहा वाजतापासून ते आठ नऊ वाजतापर्यंत नदीपात्रातून रेती काढून बाहेर डंपींग केली जाते. सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने विरोध नको म्हणून तेथील एका मंदिरात रेती तस्करांनी लाखो रुपयांचा दाम दिल्याची चर्चा आहे. ढोरवाडा हे गाव जुने गाव व नवीन गाव अशा दोन भागात विभागला गेला आहे. मंदिर नवीन गावात आहे व याच मंदिराला रेती तस्करांनी दान दिल्याचे बोलले जाते. तर वैनगंगा नदी जुन्या गावाला लागून आहे. त्यामुळे जुन्या गावातील नागरिकांनी अर्धा पैसा आम्हाला द्यावा, अशी मागणी केल्याने दोन गावात वाद निर्माण झाला असून रेती घाटावरून रेतीची चोरी अशीच सुरु राहिली तर, जुने गाव व नवीन वसाहत यांच्यात वादंग निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
ढोरवाडा रेतीघाटावरून चोरी केलेली रेती चारगाव - देव्हाडी रस्त्यालगत डंपींग करून ठेवण्यात येते. तसेच ट्रॅक्टरद्वारे सकाळच्या वेयी देव्हाडी, तुमसर, खापा, मोहाडी परिसरात घरबांधकामासाठी पोहचविली जात आहे. रेती चोरी होताना सर्व नागरिकांना दिसत आहे. परंतु तेथील तलाठी, पोलीस पाटील, सरपंच जे रेतीचोरी थांबविणाऱ्या समितीचे सदस्य आहेत. त्यांना हे सर्व दिसत नाही व ते मुख्यालयाला याची माहिती देत नाही.
यातून काय समजावे असा प्रश्न काही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत असून ढोरवाडा रेती घाटावरून होत असलेली रेतीची चोरी त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी करीत आहेत. तालुक्यातील सर्वच रेतीघाटावरून कोट्यावधीची रेती चोरी झालेली असून आताही बेरोकटोक रेतीची चोरी सुरुच आहे. मात्र तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशसन सुद्धा आंधळे असल्याचे सोंग करीत आहे.