राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:16 IST2017-08-02T23:15:33+5:302017-08-02T23:16:17+5:30
एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे.

राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारा - साखळी बीट क्रमांक ३६४ मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मे महिन्यात ही सागवान झाडे कापण्यात आली. बिंग फुटू नये म्हणून झाडांचा पंचनामा करून दुसरे आडजात तथा सागवन झाडे चिचोली वनडेपोत गोळा करण्यात आली. त्या थुटांचा आकार कमी जास्त आहे हे विशेष.
पवनारा बिट अंतर्गत कंपार्टमेंट (बिट) ३६४ अंतर्गत साखळी गावाजवळ कृषीदेव टेकडी आहे. टेकडीच्या पायथ्याशी सन १९९६-९७ मध्ये सागवान तथा अन्य आडजात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. २० वर्षानंतर ही सर्व झाडे निश्चितच मोठी झाली आहेत. सदर जंगल राखीव वनात मोडते. मे महिन्यात या बिटमधील सुमारे ५७ सागवन वृक्षांची कत्तल करण्यात आली. सुमारे ३ ते साडेतीन फुट झाडांची गोलाई (रुंदी) आहे. जुलै महिन्यात हा प्रकार येथे उघडकीस आला.
वनविभागाने सदर प्रकरण दाबण्याकरिता सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रकार सुरु केला आहे.
प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून ११ झाडांच्या थुटांचा (पी.आर.) पंचनामा केला. त्याला हॅमरींग केले.
चिचोली येथील लाकूड आगारात बिजा, रोहन तथा आसलपानी येथून शेतकºयांकडून सागवान वृक्ष खरेदी करून जमा करण्यात आले. येथे धक्कादायक बाब ही की कंपार्टमेंट क्रमांक ३६४ मधील कापलेली सागवान झाडे व चिचोली वनडेपोत जमा केलली झाडांचे थुटात मोठा फरक आहे हे विशेष.
कापलेल्या झाडांच्या थुटासभोवताल पालवी फुटली असून ही थुटे सध्या झाकल्या गेली आहेत. येथे वनविभाग व कंत्राटदारांच्या संगनमताने ही सागवान झाडे कापण्यात आली असे दिसून येत आहे.
कापलेल्या झाडांवर वनविभागाने हॅमरिंग केले आहे. परंतु थुटांच्या आकारात तफावत कशी हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
जंगलापासून जवळ एका गावात एक लाकूड कंत्राटदार राहतो. त्या कंत्राटदारासोबत फिक्सींग करून ही झाडे उन्हाळ्यात कापण्यात आली. सदर सागवान नागपूर येथे विक्री करण्यात आल्याचे समजते.
राखीव जंगलाचा परिसर व इतर गावापासून दूर असून सहसा या जंगलाव्याप्त परिसरात कुणी भटकत नाही. त्याचा फायदा येथे लाकूड तस्करांनी घेतला आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४७ हजार १५२ सागवान वृक्षापैकी २९ हजार ७९० रुपयांचा लाकूड हस्तगत करण्यात आला, त्यापैकी १७ हजार रुपयांचा लाकूड हस्तगत करणे शिल्लक आहे. १.१०७ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून नियमानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. सध्या आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
- एम.एन. माकडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकडोंगरी