उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:17 IST2019-02-03T23:16:56+5:302019-02-03T23:17:12+5:30
शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.
येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व लाखांदूर येथील महिलांनी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नासाठी २८ जानेवारीपासून उपोषण सुरु केले होते. धानाला अडीच हजाररुपये हमीभाव द्या अथवा ७५० रुपये बोनस जाहिर करा, नगर पंचायतीमध्ये बंद असलेली रोजगार हमी योजनेची कामे पुर्ववत सुरु करा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरु करण्यात आले होते. कड्याक्याच्या थंडीतही सलग सहा दिवस मंडपात उपोषणकर्ते ठाण मांडून बसले होते. यात प्रियंक बोरकर, ज्योत्सना सिंगाडे, अंजना शिंगाडे, लता हुमणे, अनिता मेश्राम, विशाखा टेंभुर्णे, मंगला मेश्राम, अंजना भुते, गोपिका सेलोटे, वैष्णवी मेंहदळे, गजानन दोनाडकर, संघटनेचे अध्यक्ष संदीप नाकतोडे, श्रीकांत बोरकर, चक्रधर ठाकूर यांचा समावेश होता.
सहा दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल आमदार बाळा काशीवार यांनी घेतली. शनिवारी उपोषण मंडपाला भेट देवून समस्या जाणून घेतल्या. उपोषणकर्त्यांच्या समस्या शासनदरबारी लावून धरण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, भाजपा जिल्हा महामंत्री नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नगरसेवक हरिष बगमारे, रमेश मेहंदळे आदी उपस्थित होते.