सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
By Admin | Updated: July 1, 2016 00:34 IST2016-07-01T00:34:20+5:302016-07-01T00:34:20+5:30
येथील राजेंद्र वॉर्डातील एका सहा वर्षीय चिमुरडीवर घराजवळीलच १६ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
मोहाडी येथील घटना : आरोपी मुलाच्या शोधासाठी चमू रवाना
मोहाडी : येथील राजेंद्र वॉर्डातील एका सहा वर्षीय चिमुरडीवर घराजवळीलच १६ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. घटनेनंतर तो युवक फरार झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी त्या युवकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. फरार झाल्यामुळे मोहाडी पोलिसांची चमू त्याचा शोध घेत आहे.
येथील राजेंद्र वॉर्डात राहणाऱ्या या मुलीच्या घराला लागुनच आरोपी युवकाचे घर आहे. ही चिमुकली आरोपी युवकाच्या घरी नेहमी खेळायला जात होती. अकराव्या वर्गात शिकणाऱ्या या युवकाने २३ मे ते १५ जून च्या दरम्यान आपल्याच घरी चिमुरडीवर अत्याचार केला. त्यामुळे त्या चिमुकलीला गंभीरस्वरूपात ईजा झाली. याची चिमुकलीच्या आई-वडिलांना कोणतीही शंका आली नाही. परंतु पिडीत चिमुकलीच्या लहान बहीणीने झालेली घटना आईला सांगितली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र बदनामीच्या भितीने या घटनेची तक्रार पोलिसात केली नाही. आजुबाजुच्या महिलांना ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी चिमुकलीच्या आईला पोलिसात तक्रार देण्यासाठी सांगितले. तक्रार दिली नाहीतर त्या मुलाचे धाडस वाढून तो पुन्हा असे कृत्य करेल, असे सांगितल्याने चिमुकलीच्या आईने बुधवारला मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या मुलीला वैद्यकीय परिक्षणासाठी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. वैद्यकीय परिक्षण अहवाल व तक्रारीच्या आधारे त्या १६ वर्षीय युवकावर भादंवि ३७६, बाललैगिंक संरक्षण अधिनियम कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होताच आरोपी युवक हा मोहाडी येथून पसार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने येथील जनतेत त्या युवकाप्रती रोष असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथुन चांदेवार हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)