सहा हजारांची लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात
By Admin | Updated: December 19, 2015 00:27 IST2015-12-19T00:27:47+5:302015-12-19T00:27:47+5:30
घर कामासाठी रेतीचा उपसा केल्याप्रकरणी ट्रॅक्टरला अडवून प्रकरण दडपण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या मोहाडी येथील सहायक फौजदार ...

सहा हजारांची लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात
मोहाडीत चर्चा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मोहाडी : घर कामासाठी रेतीचा उपसा केल्याप्रकरणी ट्रॅक्टरला अडवून प्रकरण दडपण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या मोहाडी येथील सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर यांना सहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना काल गुरूवारी रात्री ७.१५ च्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यासमोर घडली. ही कारवाई भंडारा एसीबी पथकाने केली.
तक्रारकर्ता यांच्याकडे शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेतला आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरच्या सहायाने जवळच्या नाल्यावरून रेती भरून आणली असता सहायक फौजदार अश्विन मेहर यांनी त्यांच्या ट्रॅक्टर अडविला.
तसेच १० हजार रूपयांची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर सहा हजार रूपये देण्याचे मान्य करण्यात आले. तक्रार कर्त्याने याची माहिती एसीबीकडे नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून काल मेहर याला मोहाडी पोलीस ठाण्यासमोरील पानठेल्यात सहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. मेहर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, अश्विन गोस्वामी, श्रीकांत हत्तीमारे यांनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)