नोटा बदलण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
By Admin | Updated: January 8, 2015 22:50 IST2015-01-08T22:50:33+5:302015-01-08T22:50:33+5:30
चलनातून २००५ पूर्वी छपाई केलेल्या नोटा हद्दपार करण्याच्या मोहिमेला सहा महिण्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याजवळील नोटा आता ३ जून २००५ पर्यंत बदलून घेता येणार आहे.

नोटा बदलण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
खराशी : चलनातून २००५ पूर्वी छपाई केलेल्या नोटा हद्दपार करण्याच्या मोहिमेला सहा महिण्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याजवळील नोटा आता ३ जून २००५ पर्यंत बदलून घेता येणार आहे. त्यामुळे नोटा बदलविण्याचा संभ्रम दूर झाला आहे.
बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी आणि चलनात असलेल्या नोटांमध्ये संगती असावी यासाठी रिर्झव्ह बँकेने नवे धोरण स्विकारले.
याद्वारेच २००५ सालापुर्वी छापण्यात आलेल्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. १०, २०, ५०, १००, ५०० किंवा १००० च्या नोटा नागरिकांनी बदलून घ्याव्यात, असे आदेश बँकेने दिले. मार्च २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेला १ जानेवारी २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही २००५ पुर्वीच्या नोटा चलनात असल्याने ग्राहकांना मुदतवाढ मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे ग्राहकांना ३० जूनपर्यंत त्यांच्याजवळील नोटा बँकेत बदलून घेता येणार आहेत. (वार्ताहर)
का बदलायच्या नोटा
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार २००५ नंतरच्या नोटा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या आहेत या नोटांची नक्कल करणे अवघड आहे. नकली नोटांचा प्रसार रोखण्यासाठी बँकेने ही खबरदारी घेतली आहे. याशिवाय २००५ नंतर छापलेल्या नोटांच्या मागे छपाईचे साल व नोटीमध्ये एक चांदीचा धागा आहे. विशेषत: १००, ५०० आणि १००० च्या नोटासंदर्भात ही काळजी घेण्यात येत आहे.
चलनातून बाद; मात्र बेकायदेशीर नाही
मुदत संपल्यानंतरही कुणाकडे नोटा राहिल्याच तर घाबरून जाण्याचे कारण नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. २००५ च्या आधीच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय झाला असला तरी या नोटांना बेकायदेशीर ठरविण्यात आलेले नाही. यामुळे ग्राहकांनी घाबरून जावू नये. २००५ पूर्वी ज्या नोटा छापल्या गेल्या. त्यासर्व नोटांवर छपाई वर्ष नव्हते.