जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मर्यादा
By Admin | Updated: June 13, 2015 00:45 IST2015-06-13T00:45:28+5:302015-06-13T00:45:28+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना नामांकन ...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मर्यादा
पडघम निवडणुकीचे : सुधारीत आदेश धडकले
भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना नामांकन अजार्सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांनी नामांकन अर्ज भरतांना उमेदवारांनी जात वैधता पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती किंवा कोणताही पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोट निवडणूकांकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक ३१ डिसेंबर २०१५ हा किंवा त्यापूर्वीचा असेल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम १२-अ, कलम -४२ (६-अ), कलम -६७(७-अ) मध्ये सुधारणा केली आहे.
ज्यांनी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल, अशांनी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे असा अर्ज केला असल्याबाबतचा कोणताही पुरावा असणे आवश्यक राहील.
जी व्यक्ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल.
जी व्यक्ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसुर केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्य झाली असल्याचे मानण्यात येईल. ती व्यक्ती सदस्य राहण्यास निरर्ह ठरेल. अध्यक्ष व सभापती पदासाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांनाही सदर सुधारणा लागू राहणार आहे. (नगर प्रतिनिधी)