दोन दिवसीय अधिवेशनासाठी शिक्षकांची सहा दिवसांची रजा

By Admin | Updated: February 6, 2016 00:32 IST2016-02-06T00:32:58+5:302016-02-06T00:32:58+5:30

नवी मुंबईत गुरुवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना ...

Six days leave for teachers for two-day convention | दोन दिवसीय अधिवेशनासाठी शिक्षकांची सहा दिवसांची रजा

दोन दिवसीय अधिवेशनासाठी शिक्षकांची सहा दिवसांची रजा

शिक्षणाचा खेळखंडोबा : विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?
भंडारा : नवी मुंबईत गुरुवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना शासनाने मंजूर केलेली 'विशेष नैमित्तिक रजा' उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली असली तरी दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी शिक्षकांनी सहा दिवसांची रजा घेतल्याने, त्याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर होत आहे. शिक्षक उपलब्ध नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांबाबत ताशेरे ओढणे हा हेतू नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणे ही तितकीच गंभीर बाब आहे. औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण विभागावर ताशेरे ओढल्यामुळे आता विशेष रजा घेऊन गेलेले शिक्षक शिक्षण विभागाच्या रडारवर आले आहेत. दुर्गम भागातील शाळा सध्या शिक्षकांअभावी ओस असल्याचे जाणवते. सध्या परीक्षेचे दिवस असून, शिक्षक हे अधिवेशनाच्या नावाखाली सुटी घेऊन पर्यटनावर गेले असल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे. अधिवेशनासाठी शासनाने जाहीर केलेली विशेष रजा औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील शेकडो शिक्षक विशेष रजा घेऊन गेले आहेत. १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी शासनाने विशेष रजा मंजूर केली होती. या रजेचा फायदा घेण्यासाठी विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत शिक्षकांनी केवळ काही रुपयांमध्ये प्राथमिक शिक्षक संघाचे तात्पुरते सदस्य स्वीकारल्याचे वृत्त राज्य पातळीवरून झळकत आहे.
शासकीय परिपत्रकात अटींच्या अधीन राहून विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यातील अट क्रमांक ३ आणि ४ नुसार शाळेचे कामकाज व्यवस्थित चालण्याची दक्षता घेण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यास राहील, तो जादा तासिका घेऊन कामाच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी पूर्ण करून घेतला पाहिजे, असे नमूद केले आहे. तथापि, १ फेब्रुवारीचा अगोदरचा दिवस ३१ जानेवारीची रविवारची सुटी आणि अधिवेशनानंतरचा दुसरा दिवसही रविवार ७ फेब्रुवारी असा आहे. त्यामुळे शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावाखाली शाळेला दांडी मारल्याचे दिसुन येते. अधिवेशनाच्या नावाखाली विशेष रजेवर गेलेल्या शिक्षकांचे आता औरंगाबाद खंडपीठाच्या निदेर्शानुसार सहा दिवसांची विनावेतन रजा करायची की सहा दिवसांची त्यांची शिलकी रजा भरून घ्यायची, याबद्दल राज्याच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविले जाणार असल्याची चर्चा आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)

अधिवेशनात गेलेल्या शिक्षकांच्या रजा शिल्लक असतील तर त्या नियमानुसार समायोजित करण्यात येतील. मात्र ज्या शिक्षकांच्या रजा शिल्लक नसतील तर वेतन कपातीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. याबाबत अजुनपर्यंत योग्य दिशानिर्देश प्राप्त झालेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात येईल.
- किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.

Web Title: Six days leave for teachers for two-day convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.