सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी जीवघेणी

By Admin | Updated: December 13, 2014 01:01 IST2014-12-13T01:01:39+5:302014-12-13T01:01:39+5:30

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला.

Single Phase Scheme Biography for Farmers | सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी जीवघेणी

सिंगल फेज योजना शेतकऱ्यांसाठी जीवघेणी


दिघोरी/मोठी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मोठा गाजावाजा करीत सन २००५ पासून सिंगलफेज विद्युतीकरणाला प्रांरभ केला. ही योजना शेतकरी, लघु उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी खुपच फायदेशीर असल्याची बतावणी करुन लाखांदूर तालुक्यातील काही गावात सिंगलफेज जोडणी सन २००६ मध्ये करण्यात आली. मात्र सदर योजना ही फसवी व निरर्थक असल्याचे जोडणी झाल्यानंतर लगेच कळायला लागल्याने शेतकरी व लघुउद्योजकांची पुरती वाताहत या योजनेमुळे झाली असल्याचे दिसून येते.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरीसह अनेक गावातील नागरीकांनी सिंगल फेज जोडणीला विरोध केला असता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही योजना अत्यंत लाभदायी असून या योजनेत भारनियमन अजिबात असणार नाही. याशिवाय १६ ते २४ तास सलग थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळणार असल्याचे सांगितले. मात्र, योजनेत केवळ आठ तासांचे थ्रिफेज विद्युत पुरवठा मिळतो. थ्री फेज विद्युत पुरवठा हा जीवघेणा ठरत आहे. याचे कारण असे की रविवार ते मंगळवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रीफेज व सिंगलफेज विद्युत पुरवठा पूर्णत: बंद ठेवला जातो.
यानंतर गुरुवार ते शनिवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजतापर्यंत थ्रीफेज पुरवठा होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्रीला मोटारपंप विंचू, साप व हिंस्त्र प्राण्याच्या दशहतीत सुरु करावयास जावे लागते. रात्रीला मोटारपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपला जीवसुध्दा गमवावा लागला आहे. मात्र, यांची अजिबात दखल सदर विभाग घेत नसल्याने शेतकऱ्यामध्ये वीज विभागाविरुध्द असंतोष खदखदत आहे.
याप्रमाणेच लघुउद्योजक राईस मिल, आॅईल मिल, आटाचक्की, वेल्डींग, वर्कशॉप व विविध लहान उद्योजकांचे उद्योग पार रसातळाला गेलेली आहेत. कुटुंबाचे दोन वेळेचे जेवणाचीसुध्दा व्यवस्था करण्यात सदर उद्योजक कमी पडत असल्याचे दिसून येते. सदर लघु उद्योजकांनी बँकांचे कर्ज घेऊन उद्योग सुरु केला. तो कर्ज कसा फेडावा, असा गंभीर प्रश्न त्यांचे पुढे पडला आहे.
दिघोरी/मोठी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान व भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मात्र स्वत:च्या पाठीचा कणा सरळ ठेवणे कठीण झाले आहे. भाजीपाला पिकाला तूट पाणी द्यावे लागते. जास्त पाणी झाल्यास संपूर्ण पीक नष्ट होते. त्यासाठी स्वत: शेतकरी शेतात राहून काही प्रमाणात पाणी देत असतो. परंतु बुधवार ते शनिवार रात्री १२ वाजता थ्रीफेज विजेचा पुरवठा होत आहे.
रात्रीला तुटपाणी कसे द्यावे व द्यायचेच झाल्यास स्वत:चा जीव मुठीत घेऊन पिकाला पाणी देऊन पीक वाचवावे लागते. धान पिकाला पाण्याची सर्वाधीक गरज असते. पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाचा पेरा कमी केला आहे.
एका बाजूला शासन सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देत आहे तर दुसऱ्या बाजूला दिघोरीत सिंचनाची सोय असुनसुध्दा पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब सिंगलफेज योजना बंद करावी, शेतकरी व लघु उद्योजकांना मारक ठरलेली सिंगलफेज योजना बंद करुन सलग १६ ते २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा तसेच लघु उद्योगांसाठी वेगळे फिडर बसवावे अशी मागणी जोर धरत आहे.
याशिवाय आजुबाजुच्या ज्या गावात सिंगलफेज योजना नाही तेथे सलग २४ तास थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जातो मग आम्हीच काय गुन्हा केला? अशा शब्दात येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली. (वार्ताहर)

Web Title: Single Phase Scheme Biography for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.