सिंदपुरी तलाव दुरूस्तीचे काम रखडले

By Admin | Updated: May 23, 2015 01:11 IST2015-05-23T01:11:04+5:302015-05-23T01:11:04+5:30

सिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही.

Sindapuri lake repair work | सिंदपुरी तलाव दुरूस्तीचे काम रखडले

सिंदपुरी तलाव दुरूस्तीचे काम रखडले

रंजित चिंचखेडे सिहोरा
सिंदपुरी येथील नादुरूस्त तलावाची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याची बोंब राजकीय पुढारी करीत असले तरी, प्रत्यक्षात यंदा तलावाचे बांधकाम पुर्णत्वास जाणार नाही. यामुळे गावकरी आणि शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावा लागणार आहे. निधी अभावी हे संकट गावकऱ्यावंर कोसडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंदपुरी गाव शिवारात असणाऱ्या तलावाची पाड २३ जुलै २०१४ ला रात्री अचानक फुटली या तलावाचे पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. आपातग्रस्त सोय शाळा आणि समाज मंदिरात करण्यात आली. गावात ४८ तास पाणी अडल्याने हक्काचे घर कोसडताना गावकऱ्यांनी अनुभवले. तासाभरात गावात होत्याचे नव्हते झाले. मदतीसाठी गावकऱ्यांनी आक्रोश निर्माण केला. शासकीय मदतीने गावकऱ्यांना झिडकारले तर स्वयंसेवी संस्थांनी गावकऱ्यांना तारले. टिनाचे शेडमध्ये वास्तव्य मिळाले. परंतु शेतकऱ्यांची जनावरे सैरबैर झाली. गावात २११ घरे जीर्ण झाली. ३०० हून अधिक एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पाण्याचा फटका गावातील रस्त्यांना बसला. तब्बल वर्ष भराचा कालावधी लोटत असताना मायबाप सरकारला गावकऱ्यांनी अनेक निवेदन दिली. परंतु गावकऱ्यांचे जीवन पुर्ववत करण्यास अपयश आले. तलाव दुरूस्तीच्या पुढाकारावरून दोन विभागात चांगलीच हमरी तुमरी झाली. जबाबदारी पासून पडवाट शोधण्यात हे दोन्ही विभाग गुंतले. राज्य आणि स्थानिक असे लघु पाठबंधारे विभागाचे स्वरूप निर्माण झाले. या वादाचा फटका तब्बल सहा महिने गावकऱ्यांना बसला. या कालावधीत साधी फाईल तयार करण्यात आली नाही. मदत वाटपात विलंब झाल्याने कुणाचे वेतन थकविल्या जात नाही. यामुळे विभागांनी टेंशन घेतले नाही. तलाव दुरूस्तीची फाईल तयार करण्यात आली. २ कोटी ४० लाख रूपये निधीचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला लघु पाठबंधारे विभागाने मंजुरी दिली. ही फाईल मंत्रालयात पोहचली आणि तिथेच मुक्काम ठोकून बसली. निधीच उपलब्ध नसल्याची बोंब थेट गावात पोहोचली.
दिल्ली, मुंबई दरबारात या फाईलवर अखेरचा हात फिरवला असल्याचे सांगण्यात येत आहे. कागदी घोडे नाचविल्याने तलावाची पाड दुरूस्त होणार नाही. यंत्रणा नियोजन बद्धरित्या तयार असताना निधीचा थांगपत्ता नाही. यंदा पावसाळा महिना भरात सुरू होणार आहे. तलावाची पाड आणि घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. ६ ते ८ महिने या कामांना आता गती मिळणार नाही. तलावाची पाड फुटली असल्याने पाणी थेट यंदा गावाततून वाहणार आहे. उभ्या जीर्ण घरांना पाणी स्पर्श करणार आहे. हे घरे पुन्हा गावकऱ्यांना अभिशाप ठरणार आहेत.
३०० एकरहून अधिक शेती रोवणीला मुकणार आहे. ७० ते ८० शेतकरी व त्यांचे कुटूंब अडचणीत येणार असताना सुद्धा कुण्या लोकप्रतिनिधींना या गावकऱ्यांची दया मया येत नाही. शासन आणि प्रशासनाच्या संवेदा बोथट झाल्याने पुन्हा पावसाळ्यात गावकऱ्यांना पाण्याचा फटका सहन करावा लागणार आहे.

Web Title: Sindapuri lake repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.