रेशीम उद्योग कार्यशाळा
By Admin | Updated: March 3, 2016 00:48 IST2016-03-03T00:48:48+5:302016-03-03T00:48:48+5:30
जिल्ह्यात वनव्यवस्थापन समितीमार्फत टसर रेशीम विकास योजना तयार करुन टसर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

रेशीम उद्योग कार्यशाळा
भंडारा : जिल्ह्यात वनव्यवस्थापन समितीमार्फत टसर रेशीम विकास योजना तयार करुन टसर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी वनविभागमार्फत लाभार्थी निवड करण्यात येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन यांनी केले.
उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन यांचे अध्यक्षतेखाली मुलभूत सुविधा केंद्र जमनी येथे टसर रेशीम उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक रेशीम उद्योग कार्यालयाचे सहाय्यक संचालक जी.एन. राठोड, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, रेशीम विकास अधिकारी एस.के. शर्मा उपस्थित होते. सहाय्यक संचालक राठोड यांनी महाराष्ट्रातील टसर रेशीम विकासाबाबत माहिती दिली.
के. बी. चव्हाण यांनी टसर किटक संगोपन व अंडीपूज निर्मिती तर ज्येष्ठ तांत्रिक सहाय्यक रायसिंग यांनी टसर कोषाचे धागा निर्मिती वन व्यवस्थापन समितीद्वारे करुन जिल्ह्यातील उत्पादित कोषावर जिल्ह्यात प्रक्रिया करणे व धागा निर्मिती करुन कापड निर्मिती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शर्मा यांनी टसर रेशीम उद्योगाचे तांत्रिक मार्गदर्शन स्लाईड शोद्वारे करतांना जिल्ह्यात आठ बचत गटामार्फत टसर कोष उत्पादन देण्यात आले असून आत्माच्या योजनेतून त्यांना आर्थिक सहाय उपलब्ध होत असल्याचे सांगितले. प्रज्ञा गोडघाटे यांनी टसर रेशीम उद्योगाकरीता लाभार्थ्यांना बीज भांडवल उपलब्ध करुन दिले जाईल तसेच टसर रेशीम व्यतिरिक्त व्यवसायाकरीता आत्मा योजनेतून लाभार्थ्यांना प्रशिक्षण, अभ्यासदौरे व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले. कार्यशाळेला भंडारा, पवनी, अडयाळ, लाखांदूर, लाखनी, साकोली वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)