उत्तर प्रदेशातील धानाचा ट्रक सिहोरा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:09+5:302021-04-07T04:36:09+5:30
: चार लाख किमतीचे धान चुल्हाड (सिहोरा) : बिहार, उत्तर प्रदेश राज्यांतून धानाची आयात करणाऱ्या ट्रकला बपेरा आंतरराज्यीय सीमेवर ...

उत्तर प्रदेशातील धानाचा ट्रक सिहोरा पोलिसांच्या ताब्यात
: चार लाख किमतीचे धान
चुल्हाड (सिहोरा) : बिहार, उत्तर प्रदेश राज्यांतून धानाची आयात करणाऱ्या ट्रकला बपेरा आंतरराज्यीय सीमेवर सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धान आयात करणाऱ्या माफियाचा शोध पोलीस घेत असले तरी अद्याप मुख्य सूत्रधार गवसले नसल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या धानाची किंमत चार लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर प्रदेश राज्याच्या सीमेजवळ असणाऱ्या बिहार राज्यातील नालंदा येथून ट्रक (क्रमांक एम.एच. १२ एस.एफ. ७९०९) मध्ये २८० क्विंटल धानाची पोती लादण्यात आली आहेत. याच राज्यातील संजय गुप्ता नामक इसमाच्या गोडावूनमधून धान खरेदी करण्यात आले आहे. ट्रकमालक विनोद विश्वकर्मा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात ट्रक मालकाचे सध्या वास्तव्य असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल १८ दिवसांनंतरही धानाची पोती भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात आहे.
.......................उत्तर प्रदेश राज्यातून धानाची पोती ट्रकचालक ओमप्रकाश यादव (२४) बनारस............................ येत असताना बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. महाराष्ट्र शासन धानाला बोनस जाहीर करीत असल्याने धानमाफियाचा उदय झाला आहे. सीमावर्ती गावांच्या शेजारी असणाऱ्या राज्यातून छुप्या मार्गाने स्वस्त दरात खरेदी करण्यात आलेल्या धानाची आयात करण्यात येत आहे. स्थानिक धानमाफियांना सीमावर्ती गावांच्या शेजारील छुपे मार्ग माहीत असल्याने ते कधी पोलिसांना गवसले नाहीत. परंतु, राज्य सीमा सील असल्याची माहिती नसलेले ट्रकचालक थेट बपेरा आंतरराज्यीय सीमेवरून येत असताना मुद्देमालासह पोलिसांच्या हाती लागले आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तपासकार्याला गती दिली असता, धक्कादायक माहिती समोर येत आहे. बिहार, उत्तर प्रदेश राज्यांतून धानाची पोती घेऊन आलेला ट्रक तारा इंडस्ट्रीज, खापा येथे जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
चार लाख किमतीचे धान या ट्रकमध्ये असल्याने मोठ्या माफियाचा यात सहभाग असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जिल्हा पणन महासंघ या धानाच्या संदर्भात निर्णय घेणार आहेत. पोलिसांनी याबाबतचे दस्तऐवज पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, अद्याप निर्णय घेण्यात आले नाहीत. यामुळे परराज्यातून धानाची आयात करणाऱ्या धानमाफियांचा शोध घेतला जात आहे. या धानमाफियांचे नाव कळण्याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
बॉक्स
तपासणी नाक्याचा फायदा
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी मंजूर करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी एक पाऊल पुढे ठेवत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाहनांची तपासणी वाढवली आहे. यामुळे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील धानाची आयात होणारी वाहने ताब्यात घेतली आहेत. संशयित वाहनांवर बेधडक कारवाई होत असल्याने मध्य प्रदेशातून अवैध साहित्य आयात होणाऱ्या वाहनधारकांत भीती निर्माण झाली आहे. धानाची पोती घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेणारी कारवाई मोठी असल्याने राजकीय दबाव वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. ट्रकमालक आता खुलासा करणार असून, धानमाफियाचे नाव उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीमेवर लोकसहभागातून पोलीस चौकीचे बांधकाम पहिल्यांदा होत आहे. गृह विभागाच्या इमारतीचे लोकसहभागातून बांधकाम होत असल्याने राज्याच्या इतिहासातील पहिलीच इमारत ठरणार आहे.
‘बपेरा आंतरराज्यीय सीमेवर धानाची पोती घेऊन आलेला ट्रक १८ मार्चला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पणन विभाग आणि महसूल विभागाला दस्तऐवज तपासाकरिता पाठविण्यात आले असून, निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल. तारा इंडस्ट्रीज, खापा येथे धानाची पोती घेऊन ट्रक जात असल्याची माहिती मिळाली आहे.
-नारायण तुरकुंडे, सहायक पोलीस निरीक्षक, सिहोरा.