दुचाकींवरील ‘साईड ग्लास’ झाले बेपत्ता
By Admin | Updated: September 4, 2014 23:36 IST2014-09-04T23:36:10+5:302014-09-04T23:36:10+5:30
वाहन चालविताना मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज कळावा, यासाठी दुचाकी, चारचाकीसह सर्वच वाहनांना साईड ग्लास बसविलेले असतात. मात्र, फॅशन म्हणून वाहनचालक दुचाकीचे साईड ग्लास काढून ठेवत

दुचाकींवरील ‘साईड ग्लास’ झाले बेपत्ता
भंडारा : वाहन चालविताना मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज कळावा, यासाठी दुचाकी, चारचाकीसह सर्वच वाहनांना साईड ग्लास बसविलेले असतात. मात्र, फॅशन म्हणून वाहनचालक दुचाकीचे साईड ग्लास काढून ठेवत असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दोन्ही बाजूला, चालकाला मागून येणारे वाहन दिसेल, अशा ठिकाणी साईड आरसे लावणे अनिवार्य आहे. मात्र फॅशनच्या नादात तरूण-तरूणीच नव्हे तर मोठ्यांकडूनही या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुण व तरुणीकडून सर्वाधिक उल्लंघन होत असून केवळ आवडत नाही यासाठी साईड ग्लास काढून ठेवले जात आहेत.
अपघात घडल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम त्या मार्गाने येणाऱ्या व जाणाऱ्यांनादेखील भोगावे लागतात. त्यामुळे वैयक्तीक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर उरणार नाही ना! याची जाणीव असणे गरजेचे झाले आहे. अलीकडच्या काळात शहरातील रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना काही प्रश्न विचारले असता आणि नागरिक व वाहतूक पोलिसांच्या नजरेतून क्षुल्लक असलेल्या काही बाबींचा उहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आले आहेत. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक फॅशन म्हणून वाहनांना साईड ग्लास लावण्याचे टाळतात. काही जण याबाबत कारवाई होऊ शकते. मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार चालत असल्याचे आढळून आले. काही वाहनधारकांनी तर साईड ग्लासची आवश्यकता काय, असा प्रतिप्रश्न केला. काहींनी मात्र साईड ग्लास आवश्यक असल्याचे सांगितले.
अनेकदा लहान सहान अपघातांमुळे तुटफूट झाल्याने साईड ग्लास तुटल्यास परवडणारे नसल्याने परत लावणे टाळले जाते. एका बाजूचे साईड मिरर तुटल्यास दुसऱ्या बाजूचा देखील काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरूण-तरूणींकडून केवळ चेहरा न्याहाळण्यासाठी साईड मिररचा वापर होत असतो. नियमांच्या विरोधात जाणाऱ्या या बाबींकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे एखादी मोठी घटना घडण्याची तर वाहतूक पोलीस वाट पाहत नाही ना!, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. (शहर प्रतिनिधी)