शटल रेल्वेचा प्रस्ताव धूळ खात
By Admin | Updated: October 3, 2015 00:33 IST2015-10-03T00:33:21+5:302015-10-03T00:33:21+5:30
भंडारा शहर रेल्वे स्टेशन व भंडारा रोड भंडारा शटल ट्रेन सुरु करण्यात यावी, या मागणीचा रेल्वे यात्री सेवा समितीने सातत्याने पाठपुरावा केला.

शटल रेल्वेचा प्रस्ताव धूळ खात
पाठपुरावा थांबला : रेलयात्री सेवा समितीचा 'एकला चलो रे'
भंडारा : भंडारा शहर रेल्वे स्टेशन व भंडारा रोड भंडारा शटल ट्रेन सुरु करण्यात यावी, या मागणीचा रेल्वे यात्री सेवा समितीने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शटल रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे धूळ खात पडला आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या काळात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्वत: प्रफुल पटेल व रेल यात्री समितीचे पदाधिकारी यांच्या बैठकीत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रफुल पटेल यांनी भंडारा-भंडारा रोड शटल ट्रेन सुरु करणे, रेल्वे पोलीस चौकी स्थापन करणे आदी मागण्याच्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार भंडारा शहर रेल्वे स्टेशन व शटल ट्रेन सुरु करण्यासंबंधी मोठ्या हालचाली झाल्या. इतकेच नाही तर शटल ट्रेन सुरु करण्यासंबंधी मोठ्या हालचाली झाल्या. इतकेच नाही तर शटल ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्याचेही समितीला कळविण्यात आले.
पटेल यांच्या प्रयत्नातून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पोलीस चौकी स्थापन झाली. गीतांजली, आझाद हिंद एक्स्प्रेस या गाड्यांचे थांबे मिळाले. शटल ट्रेनसाठी तीन वेळा तांत्रिक तपासणी झाली. समितीला नुकतेच एक पत्र रेल्वेकडून मिळाले असून भंडारा शटल ट्रेनसाठी लाईन सुरु करण्यासाठी अनुमानित २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले. व त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडे १९ कोटी १५ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु बोर्डाने तो मान्य केला नसल्याचे दुसरे पत्र रेलयात्री सेवा समितीला पाठविण्यात आले आहे.
पुढील महिन्यात नागपूर येथे रेलवे बोर्डाचे अधिकारी, मंत्री व खासदारांची कमेटी यांची रेल्वेसंबंधी बैठक होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांना खासदार प्रफुल पटेल व लोकसभेचे खासदार नाना पटोले यांनी वाचा फोडावी, अशी अपेक्षा रेल्वेयात्री सेवा समितीने केली आहे. (शहर प्रतिनिधी)