शटल रेल्वेचा वाली नाहीच

By Admin | Updated: February 28, 2015 00:51 IST2015-02-28T00:51:39+5:302015-02-28T00:51:39+5:30

रेल्वे अर्थसंकल्पात भंडारा जिल्ह्याच्या वाटेला भोपळा मिळाल्यावर जिल्हावासियांच्या आशेवर पुन एकदा पाणी फेरल्या गेले.

Shuttle is not a railhead | शटल रेल्वेचा वाली नाहीच

शटल रेल्वेचा वाली नाहीच

इंद्रपाल कटकवार भंडारा
रेल्वे अर्थसंकल्पात भंडारा जिल्ह्याच्या वाटेला भोपळा मिळाल्यावर जिल्हावासियांच्या आशेवर पुन एकदा पाणी फेरल्या गेले. भंडाऱ्यातील शटल रेल्वे प्रस्ताव असो की पवनी तालुक्यातून जाणाऱ्या उमरेड ते नागभीड या ९६ कि.मी.रेल्वेच्या ब्रॉडगेजचे काम. अर्थसंकल्पात छदामही मिळाला नसल्याने जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या शटल रेल्वे प्रकल्पाचा वाली खरचं कुणी नाही, असेच म्हणावे लागेल. सरकार कुणाचेही असो भंडाऱ्याची स्थिती बदललेली नाही.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि शासनाची दिरंगाई यामुळे भंडारा जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांची अधोगती झाली आहे. भंडारा शहरातील एकमेव भंडारा ते वरठी मार्गावर प्रस्तावित शटल रेल्वे प्रकल्पाला सद्य स्थितीत पाच कोटी रुपयांची गरज आहे. गत १० वर्षांत या प्रकल्पाची किंंमत दुपटीने वाढली. जवळपास दोन दशकांपासून रेंगाळत आहे.
जिल्ह्यात नवीन प्रस्तावांपैकी भंडारा-वरठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण व प्लॅटफार्म बांधकामाची मागणी सर्वात जुनी आहे. जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक भंडाऱ्याहून हाकेच्या अंतरावर असलेल्या वरठी येथे आहे.
कलकत्ता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेल्या भंडारा रोड रेल्वे स्थानक(वरठी) भंडारा आणि गोंदिया जिल्हयातील नागरिकांसाठी विशेष बाब आहे.
भंडाराहून वरठीचे अंतर १० कि.मी. आहे. जिल्हा मुख्यालय जवळ असलेले हे रेल्वे स्थानक मात्र अनेक सोईपासून वंचित आहे. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर अनेक वेगवान गाड्यांना थांबे देण्यात आलेले नाहीत. भंडारा रोड रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून या ठिकाणी मेल, सुपरफास्ट गाड्यांचे थांबे देण्यात आलेले आहेत.
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एक्सप्रेस रेल्वे गाडीचे थांबे देण्यात येतील, अशी घोषणा केली होती. परंतु तसे झाले नाही.
लागून असलेल्या अन्य जिल्ह्यातील रेल्वे समितीचे पदाधिकारी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा दिला नाही तरी चालेल, अशी दिशाभूल रेल्वेच्या अधिकाऱ्यांची करतात, असा आरोप भंडारा रेल्वे सेवा समितीने करीत महत्त्वाच्या रेल्वे थांबविण्याची मागणी केली होती.
मात्र ती मागणी पूर्ण मान्य झालेली नाही.

 

Web Title: Shuttle is not a railhead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.