भंगार बसचा प्रवाशांना बसला फटका
By Admin | Updated: August 27, 2015 00:53 IST2015-08-27T00:53:36+5:302015-08-27T00:53:36+5:30
आगाराची लेंडेझरी-तुमसर एस.टी. बसमध्ये सुरुवातीला तांत्रिक बिघाड झाल्याने बस अर्धा तास उशिरा आली.

भंगार बसचा प्रवाशांना बसला फटका
विद्यार्थ्यांना शाळेला मारावी लागली बुट्टी : एसटी आगार लक्ष देणार काय?
तुमसर : आगाराची लेंडेझरी-तुमसर एस.टी. बसमध्ये सुरुवातीला तांत्रिक बिघाड झाल्याने बस अर्धा तास उशिरा आली. दरम्यान तुमसरकडे येत असताना मिटेवानीजवळ टायर पंक्चर झाल्याने व दुसऱ्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना दोन तास रस्त्यावर ताळकळत उभे राहावे लागले. हा प्रकार बुधवारला सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास घडला.
तुमसर आगारातील बहुतांश बसेस भंगारात निघाल्यागत जमा आहेत. त्या बसेसना रस्त्यावर चालविल्या जात असून अनेक अपघात घडल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र अजूनपर्यंत आगारप्रमुखांनी त्याची साधी दखलही घेतली नसल्याचे समजते.
मात्र अशा घटनेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याची प्रचिती आज घडलेल्या घटनेवरुन दिसून आली. तुमसर आगाराची एस.टी. बस एम.एच. ४०-८११० तुमसर-लेंडेझरी ही बस तुमसर आगारातून सकाळी ८ वाजताच्या सुमारास निघाली असता लेंडेझरी या जंगलव्याप्त आदिवासी बहुल गावात जावून थांबली. ती थांबलीच राहिली. तांत्रिक बिघाडामुळे अर्धा पाऊण तास चालकाने स्वत:चे डोके चालवून कशीबशी सुरु केली.
तालुक्यातील लेंडेझरी, आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., पवनारखारी, गोबरवाही या आदिवासी गावातील प्रवाशी तसेच शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बस सोयीचे होत असल्यामुळे या बसमध्ये चढले. मात्र मिटेवानी शेतशिवाराजवळ येताच मागचे टायर पंक्चर झाले.
एस.टी. बसेसमध्ये बिघाड झाल्यास त्या बसचे प्रवासी दुसऱ्या बसमध्ये स्थालांतरीत करतात. मात्र नाकाडोंगरी तुमसर मार्गावर खुपच कमी बसगाड्या धावत असल्यामुळे प्रवाशी दोन तास थांबूनही एकही गाडी आली नाही किंवा आगारातील वर्कशॉपचे कर्मचारी न आल्याने चालकाला स्व:त टायर बदलावे लागले. परिणामी सकाळी १०.३० वाजता तुमसर पोहचणारी लेंडेझरी तुमसर बस दुपारी १ वाजता पोहचल्याने शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना नाईलाजास्तव शाळेला दांडी मारावी लागली. तसेच त्रास त्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे आगार प्रमुखांनी जातीने लक्ष पुरवून या बसेसच्या समस्या निकाली काढावा अशी प्रवाशांनी मागणी केली. (शहर प्रतिनिधी)