श्रमदान-लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी फुलवली बाग
By Admin | Updated: April 27, 2015 00:15 IST2015-04-27T00:15:05+5:302015-04-27T00:15:05+5:30
विद्यार्थी शालेय जीवनाचा आरसा आहे. लहानपणापासून जिद्द व चिकाटीने कोणतेही उपक्रम ..

श्रमदान-लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी फुलवली बाग
ताडगाव शाळेचा उपक्रम : विविध उपक्रम
विलास बन्सोड उसर्रा
विद्यार्थी शालेय जीवनाचा आरसा आहे. लहानपणापासून जिद्द व चिकाटीने कोणतेही उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविल्यास त्यांच्यावर निश्चितच स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागतो.
असाच एक प्रकार मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ताडगाव येथील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींबाबत घडला. या विद्यार्थ्यांनी शाळेतच श्रमदान व लोकवर्गणीतून बाग फुलवली असून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जेमतेम १७५ विद्यार्थी या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास भड यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांनी सन २०१३-२०१४ या वर्षात श्रमदान व लोकवर्गणीतून शाळेच्या आवारात बाग लावण्याचे ठरविले.
तेव्हाच विद्यार्थ्यांनी बगिचाच्या कामाला सुरुवात केली. यात रोज विद्यार्थी श्रमदान करीत असून बगिचा परिसरातून गवत, कचरा नियमित काढतात. शिवाय बगिचातल्या झाडासाठी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी गोळा करुन झाडे लावली. या झाडांना पाणीसुध्दा रोज नियमितरीत्या दिले जाते. सध्या ही बाग हिरवीगार झाली असून बहरली आहे.
जिल्हा परिषद ताडगाव या शाळेत विविध उपक्रम लोकवर्गणीतून राबविली जात आहे. त्यात शिक्षक-पालक व नागरिकांकडून मदत मिळत असते. शाळेला खेळण्याच्या दृष्टीने जागा नव्हती अशावेळी नागरिकांच्या लोकवर्गणीतून १ लक्ष ४२ हजार रुपयांची विद्यार्थ्यांना खेळण्याच्या दृष्टीतून जागा घेण्यात आली. यात तत्कालीन शाळा उत्पादन समितीचे अध्यक्ष राजू धांडे, विजय राघोर्ते, सरपंच बिरज वनवे, उपसरपंच अल्का नागलवाडे, रमेश हलमारे, मुख्याध्यापक डी. जी. भड, सहायक शिक्षक के. एम. राणे, एन. टी. गायधने, आर. सी. मेश्राम, पी. के. शेंडे, पी. आर. गिरीपुंजे, डी. पी. भांगे आदीनी मोलाचे सहकार्य केले.
याशिवाय लोकवर्गणीतून ३४ हजार रुपयांची नळयोजना, ३० हजार रुपयांची ध्वनिक्षेप असे विविध उपक्रम लोकवर्गणीतून करण्यात आले आहे.
श्रमदान व लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी सुरु केलेला हा बगीचा म्हणजे विद्यार्थ्यांनी पत्करलेला उत्तम मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना श्रमदान व लोकवर्गणीचे महत्व समजू लागले आहे.
- दुर्गादास भड,
मुख्याध्यापक जि.प. शाळा ताडगाव