अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर ‘गो बॅक’च्या घोषणा; काळे झेंडे दाखवून व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 09:28 PM2021-10-29T21:28:52+5:302021-10-29T21:30:48+5:30

विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती शुक्रवारी तुमसर तालुक्याच्या दौऱ्यावर आली. समितीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येरली येथील खाजगी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.

shouted slogan of ‘go back’ before the Scheduled Tribes Welfare Committee; Anger expressed by showing black flags in tumasar | अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर ‘गो बॅक’च्या घोषणा; काळे झेंडे दाखवून व्यक्त केला संताप

अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर ‘गो बॅक’च्या घोषणा; काळे झेंडे दाखवून व्यक्त केला संताप

Next

तुमसर - विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समितीने येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या भेटीनंतर येरली आश्रमशाळेची पाहणी गेली. मात्र तुमसर शहरातील आदिवासी विद्यार्थी वस्तिगृहाला भेट दिली नाही. एवढेच नाही, तर आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे संतप्त आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुमसर येथे समितीला काळे झेंडे दाखवून ‘गो बॅक’च्या जोरदार घोषणा दिल्या. यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती शुक्रवारी तुमसर तालुक्याच्या दौऱ्यावर आली. समितीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येरली येथील खाजगी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी चर्चा करण्यासाठी आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते चौकात समितीची प्रतीक्षा करीत होते. वाहनांचा ताफा न थांबता जात असल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. २८ ऑक्टोबर रोजी शासनाने जीआर काढला, त्यात आदिवासी बांधवांवर अन्याय होत असल्याचा आरोप आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

त्यानंतर विधिमंडळाची कल्याण समिती जंगल खापा आश्रमशाळेकडे रवाना झाली. कार्यकर्त्यांनी दुचाकीने समितीचा पाठलाग केला. सुसुरडोह येथे मोठ्या संख्येने आदिवासी पुरुष, महिला समितीची प्रतीक्षा करीत होते. परंतु समितीच्या सदस्यांनी तेथेही चर्चा केली नाही. त्यानंतर समितीचा ताफा जंगल खापाकडे रवाना झाला. पुढे समिती विटपूर गावाकडे रवाना झाली. आधी ठरवून दिलेल्या गावांना समितीने भेट दिली, त्यामुळे आदिवासी कार्यकर्ते संतप्त झाले. तुमसर तालुक्यातील ४५ गावे आदिवासीबहूल आहेत. तेथील आदिवासी बांधवांशी किंवा संघटनांशी समितीने कोणतीही चर्चा केली नाही. याचा संघटनेने निषेध केला आहे.



 

समितीचा निषेध -
तुमसर येथे आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तिगृह आहे. येथे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत; परंतु येथे समितीने भेट दिली नाही. येथे आदिवासी बांधवांच्या समस्या दूर होत नाहीत. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नसतील तर अशा समितीचा उपयोग काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. या समितीचा आदिवासी सेवक अशोक उईके, प्रभा पेंदाम, दुर्गाप्रसाद परतेती, हरिप्रसाद वाढीवे, सुभाष धुर्वे, राकेश राऊत, लक्ष्मीकांत सलामे, संजय मरस्कोल्हे, किशोर उईके, संगीता धुर्वे आदींनी निषेध केला आहे.
 

Web Title: shouted slogan of ‘go back’ before the Scheduled Tribes Welfare Committee; Anger expressed by showing black flags in tumasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.