तुमसर तालुक्याचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

By Admin | Updated: May 13, 2017 00:21 IST2017-05-13T00:21:00+5:302017-05-13T00:21:00+5:30

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका क्रमांक दोनचा तालुका असून शासनाला महसूल मिळवून देणारा एक महत्त्वपूर्ण तालुका आहे.

On the shoulders of the charge of Tumsar taluka | तुमसर तालुक्याचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

तुमसर तालुक्याचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पदे रिक्त : नियमित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पुढाकाराची गरज
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका क्रमांक दोनचा तालुका असून शासनाला महसूल मिळवून देणारा एक महत्त्वपूर्ण तालुका आहे. तुमसर तालुक्यात शासनाच्या सहा कार्यालयात अधिकाऱ्यांच्या जागा मागील काही महिन्यापासून रिक्त असून कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. संवेदनशिल तथा राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला तुमसर तालुका अधिकारीविहीन कसा, असा प्रश्न येथे पडला आहे.
तुमसर तालुका जिल्ह्यात क्षेत्रफळात क्रमांक दोनचा तालुका असून आंतरराज्यीय सीमा येथे लागून आहेत. महत्वपूर्ण कार्यालयाच्या प्रमुखांचे पद मागील अनेक महिन्यापासून येथे रिक्त आहेत. संवेदनशील तालुक्यात तुमसर तालुक्याचा समावेश शासन दप्तरी आहे. तुमसर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांचे पद मागील चार महिन्यापासून रिक्त आहे. पोलीस निरीक्षक पदाचा प्रभार जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. नागरे यांचेकडे सोपविण्यात आला आहे. तुमसर शहर नेहमी चर्चेत राहते. अनेक अप्रिय घटना शहरात घडतात. संवदेनशील शहर म्हणून तुमसरची ओळख आहे, परंतु येथे चार महिन्यापासून नियमित पोलीस निरीक्षक मिळाला नाही. सोनी हत्याकांड, नगरसेवक प्रशांत उके व त्याचा धाकट्या भावाची येथे हत्या झाली होती. पोलीस कोठीडीतील आरोपीची केक पार्टी पुर्ण राज्यात गाजली हे विशेष.
तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर नियमित मुख्याधिकारी अजून आले नाही. भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे तुमसर नगरपरिषदेचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तीन वर्षे पूर्ण होण्यापुर्वीच चंद्रशेखर गुल्हाणे यांची बदली झाली. तुमसर येथे भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमी अभिलेख उपअधिक्षक मारोवकर यांची बदली झाली. मागील एक वर्षापासून येथे नियमित भूमी अभिलेख उपअधिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. मोहाडीचे भूमी अभिलेख उपअधिक्षक बी.आर. घाडगे यांचेकडे सध्या प्रभार सोपविण्यात आला आहे. ते दर मंगळवारी तुमसर येथे येतात. तुमसर शहर व तालुक्यातील नागरिकांना येथे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रकरणाचा निपटारा कसा केला जात असेल, हा संशोधनाचा विषय आहे.
तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे हे सुद्धा प्रभारी आहेत. मागील एक वर्षापासून त्यांच्याकडे प्रभार आहे. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाला नियमित अधिक्षक केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे विशेष.
राज्य शासनाचे तुमसर तालुक्यात सात पशु रुग्णालये आहेत. त्यांच्या देखरेखीकरिता तुमसर शहरात पशुसंवर्धन उपआयुक्त हे पद आहे. मागील तीन महिन्यापासून सदर पद रिक्त आहे. डॉ. मंगेश काळे यांची बदली नागपूर येथे करण्यात आली. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून डॉ. व्ही.ए. ईटनकर कारभार सांभाळीत आहेत. राज्य शासनाच्या चार रुग्णालयात पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. त्यातून मार्ग काढण्याकरिता राज्य शासनाने तुमसर तालुक्यात पशू दवाखाना सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली. नियमित डॉक्टरची पदे येथे भरण्याची गरज आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे नियमित पद येथे वर्षभरापासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी गभने सेवानिवृत्त झाले तेव्हापासून येथे नियमित तालुका कृषी अधिकारी नाही. गोरगावचे तालुका कृषी अधिकारी एम.ए. वावधणे यांचेकडे तुमसरचा प्रभार देण्यात आला आहे. येथे नियमित अधिकाऱ्यांची तारांबळ उडते तर प्रभारी अधिकारी कसे कामे करीत असतील, हा संशोधनाचा विषय आहे. नियमित कामे, पारदर्शी प्रशासन असे घोषवाक्य शासनाचे आहे. नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती महत्वाची आहे.

Web Title: On the shoulders of the charge of Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.