दोन ‘वॉटर प्लान्ट’वर धाड

By Admin | Updated: May 9, 2017 00:20 IST2017-05-09T00:20:46+5:302017-05-09T00:20:46+5:30

थंड व शुध्द पाण्याच्या नावावर शहरासह जिल्हाभरात ‘मिनरल वॉटर प्लान्ट’ चा गोरखधंदा सुरु आहे. विनापरवाना सुरु असलेल्या ...

Shot on two 'water plant' | दोन ‘वॉटर प्लान्ट’वर धाड

दोन ‘वॉटर प्लान्ट’वर धाड

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : विनापरवाना प्रकरण भोवले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : थंड व शुध्द पाण्याच्या नावावर शहरासह जिल्हाभरात ‘मिनरल वॉटर प्लान्ट’ चा गोरखधंदा सुरु आहे. विनापरवाना सुरु असलेल्या प्लॅन्ट वर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईत भंडारा येथील दोन वॉटर प्लॅन्टवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त बी. जे. नंदनवार यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. राऊत यांनी ही छापा कारवाई केली. म्हाडा कॉलनीतील ऐवन निर्मल एक्वॉ व दाभा येथील सतनाम इंडस्ट्रीज या दोन ‘मिनरल वॉटर प्लॅन्ट’वर शनिवारला छापा घालण्यात आला. प्लान्टच्या तपासणीदरम्यान जीआयएस प्रमाणपत्र व अन्न व औषध विभागाचा (एफएएसआय) परवाना तपासण्यात आला. या दोन्ही प्लॅन्ट मालकांकडे याचा परवाना नसल्याची बाब उघड झाली. यामुळे या प्लॅन्टमधून भंडारा शहरासह अन्य भागात पुरवठा करण्यात येणारे शुध्द पाणी केवळ कागदोपत्री असल्याचे आढळून आले. नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याच्या नावावर वॉटर प्लॅन्ट मालकांकडून पाण्याचे योग्य मानक नसलेले पाणी पुरवठा करण्यात येत होते. ही बाब लक्षात आल्याने अन्न व औषध प्रशासनाने या दोन्ही ‘मिनरल वॉटर प्लॅन्ट’वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शुध्द व थंड पिण्याचे पाणी पुरवठा करण्याच्या नावावर भंडारा शहरासह ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात हा गोरखधंदा सुरु आहे.
मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायातून रग्गड बनलेल्या व्यवसायिकांनी प्रशासनाचा परवाना न घेता. हा व्यवसाय राजरोसपणे सुरु ठेवला आहे. विवाह समारंभ असो वा वाढदिवस, बारसे, तेरवी यासह अन्य कुठल्याही कार्यक्रमात सर्वत्र मिनरल वॉटरचे पाणी पिण्यासाठी पोहोचविण्याची जबाबदारी वॉटर प्लान्टधारक करीत आहेत. मात्र या कारवाईने ‘मिनरल वॉटर प्लान्ट’ मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

परवानाधारक अत्यल्प
सात तालुक्यांच्या जिल्हा असलेला भंडाऱ्यात मिनरल वॉटरच्या नावावर अनेकांनी गोरखधंदा सुरु केला आहे. या प्लॅन्टधारकांकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना किंवा प्रमाणपत्र नसल्याची गंभीर बाब या छापा कारवाईमध्ये उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यात केवळ आठ प्लॅन्ट धारकांना परवाना असून उर्वरित प्लॅन्ट केवळ ‘आशिर्वाद’मुळे सुरु असल्याचे दिसून येते. यामुळे या प्रशासनाने आता सर्वांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेतला आहे.
दोन प्लान्टचा पाठविणार अहवाल
ऐवन निर्मल एक्वॉ व सतनाम इंडस्ट्रीज दाभा या दोन ‘मिनरल वॉटर प्लॅन्ट’वर प्रतिबंधीत कारवाई करण्याच्या दृष्टीने सहायुक्तांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या दोन्ही प्लॅन्ट धारकांकडून यापुढे हा व्यवसाय करणार नाही असे लिहून घेतल्याचे समजते.
पाण्यासाठी नागरिकांची धावपळ
या छापा कारवाईचे पडसाद जिल्हाभरात ‘मिनरल वॉटर’ प्लॅन्ट धारकांमध्ये उमटले आहे. कारवाईच्या भितीने अनेक प्लॅन्टधारकांनी प्लॅन्ट बंद ठेवले आहे. त्यामुळे नेहमी वॉटर प्लॅन्ट मधून पिण्याचे पाणी नेणा-या नागरिकांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. शहरातील एका केंद्रावर पाण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र हा प्लॅन्टधारक अन्य प्लॅन्टवरुन आलेल्या नागरिकांना पाणी देण्यास मज्जाव करीत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमानुसार अनेकांकडे परवाने नाहीत. त्यामुळे वॉटर प्लॅन्टची तपासणी करण्यात येत आहे. म्हाडा कॉलनीतील ऐवन निर्मल अ‍ॅक्वा दाभा येथील सतनाम इंडस्ट्रीजकडे परवाना नसल्याची बाब उघडकीस आली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा अहवाल पाठविण्यात येईल.
- बी. जे. नंदनवार, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, भंडारा

Web Title: Shot on two 'water plant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.