करडी परिसरात युरिया खताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:38+5:302021-04-05T04:31:38+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात शेतीच्या उत्पन्नावरच येथील नागरिकांचे अर्थचक्र अवलंबून आहे. शासनाच्या विविध योजनांतून थोडीफार सिंचनाची ...

करडी परिसरात युरिया खताचा तुटवडा
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात शेतीच्या उत्पन्नावरच येथील नागरिकांचे अर्थचक्र अवलंबून आहे. शासनाच्या विविध योजनांतून थोडीफार सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने खरिपाबरोबर उन्हाळी धानाचे क्षेत्रसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उन्हाळी पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. परंतु, परिसरातील एकाही कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण भटकत आहेत. युरियावर अधिक नफा मिळत नसल्याने कृषी केंद्र चालकांनीच तुटवडा निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.
करडी परिसरात उन्हाळी धानाच्या रोवण्या पूर्ण झाल्या असून, धान पालवीवर सुटले आहे. मात्र, कृषी दुकानामध्ये शेतीसाठी लागणारे युरिया खत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
मार्च महिन्यापासून युरिया खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. खेड्यापाड्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी थेट तालुक्याच्या ठिकाणी युरिया खत घेण्यासाठी येत असतात; मात्र तिथेसुद्धा युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या कृषी केंद्र चालकांकडे युरिया उपलब्ध आहे. ते कृषीसेवा केंद्र चालक युरिया खताचा तुटवडा दाखवून जादा भावाने विक्री करीत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, वेळेवर खत न मिळाल्यामुळे शेतीच्या पुढील उत्पन्नावर त्याचा परिमाण होत आहे.
ज्या कृषी केंद्र संचालकांकडे युरिया खते नाहीत, त्यांनी तातडीने खते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन जे कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करीत असतील अशा कृषी दुकानदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.