संयुक्त भरारी पथकाने घातली कृषी केंद्रांसह दुकानांवर धाड
By Admin | Updated: September 21, 2014 23:46 IST2014-09-21T23:46:14+5:302014-09-21T23:46:14+5:30
जीवनावश्यक वस्तूंसह खतांचा काळाबाजार करून ज्यादा किमतीने विक्री प्रकरणी भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण भरारीपथकाने धाड मारून एकाला अटक केली. चिखला, नाकाडोंगरी व गोबरवाही

संयुक्त भरारी पथकाने घातली कृषी केंद्रांसह दुकानांवर धाड
तुमसर : जीवनावश्यक वस्तूंसह खतांचा काळाबाजार करून ज्यादा किमतीने विक्री प्रकरणी भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण भरारीपथकाने धाड मारून एकाला अटक केली. चिखला, नाकाडोंगरी व गोबरवाही परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या भरारी पथकात कृषी विभागाचे अधिकारीही होते. ही सर्व कारवाई गुप्त ठेवण्यात आली हे विशेष.
शुक्रवारी तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील गोबरवाही, चिखला व नाकाडोंगरी येथे भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड मारली. यात नाकाडोंगरी येथील एकाला अटक करण्यात आली आहे. चिखला व इतर ठिकाणी कारवाई झाल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी पथकासोबत घेतले होते. तुमसर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना या पथकाबद्दल विचारले असता भरारी पथक तालुक्यात भंडाऱ्यावरून आपल्याची माहिती दिली. परंतु कारवाईबद्दल माहिती नाही असे सांगितले.
गोबरवाई येथील पोलीस निरीक्षक वाढीवे यांना विचारले असता पथकातील अधिकाऱ्यांनी दोन पोलिसांची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना दोन पोलीस शिपाई दिले होते. कारवाईबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. पथकातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कावळे यांना विचारले असता मी सध्या नागपूर येथे पोलीस ठाण्यात आरोपीसह असून कारवाई सुरु असून व्यस्त असल्याचे सांगितले. या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू रॉकेल, घरगुती गॅस सिलिंडर व खतांचा सर्रास काळाबाजार सुरु आहे. एका तक्रारीच्या आधारावर ही कारवाई झाल्याची माहिती आहे.
या परिसरात काळाबाजार सुरु आहे. शुक्रवारी कारवाईनंतर या परिसरात एकच खळबळ माजली होती. सदर प्रकरण दाबण्याकरिता ही मोठ्या हालचाली करण्यात आल्याचे समजते. परंतु भरारी पथकाने शेवटी कारवाई केली. या प्रकरणात मूळ मोठे मासे या पथकाच्या गळाला लागणार काय, हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणात कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)