खरेदी करा मनसोक्त, पण कोरोना नियमांचे भान ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:42+5:30
गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते.

खरेदी करा मनसोक्त, पण कोरोना नियमांचे भान ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या एकदम कमी झाली. प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलास मिळाला. आता दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्यातच प्रशासनाने सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत नागरिक मनसोक्त खरेदी करणार आहे.
गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते.
भंडारा शहरातील मेन लाईन मोठ्या बाजारमध्ये तर गत दोन दिवसांपासून तुफान गर्दी झाली आहे. अनेक दुकानात पाय ठेवायला जागा नाही. त्यातच आता प्रशासनाने शुक्रवारी आदेश निर्गमित करून रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांना होणार आहे. परंतु खरेदी करताना सद्य:स्थितीत कुणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही.
मास्क तर बेपत्ताच झाला आहे. फिजिकल डिस्टन्सिंगही कोणी पाळत नाही. अशा स्थितीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. सहकुटुंब दिवाळीची खरेदी करीत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग जवळजवळ नाहीत जमा आहे. जिल्ह्यात केवळ चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व जण बिनधास्त झाले आहे. मात्र, होणारी गर्दी प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना खरेदी करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्यावसायिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु यानंतरही बाजारात कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही.
नियमांना तिलांजली धोक्याची घंटा
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक जण भयभीत होता. मास्क लावून आणि सॅनिटायझर सोबत ठेवूनच बाहेर पडत होता. परंतु आता असे चित्र कुठेही दिसत नाही. नाकावरून हनुटीवर आणि तेथून मास्क बेपत्ता झाला आहे. कुणीही मास्क लावताना दिसत नाही. शासकीय कार्यालयात जायचे असेल तर खिशात मास्क बाळगणारे अनेक जण आहे. गर्दी करून खरेदी करणे आणि नियमांना तिलांजली देणे धोक्याची घंटा ठरू शकते.