ग्राहक मंचचा युनियन बँकेला झटका
By Admin | Updated: November 5, 2015 00:41 IST2015-11-05T00:41:42+5:302015-11-05T00:41:42+5:30
एटीएम मशीनमधून पैसे न निघाल्यावरही तेवढे पैसे विड्राल झाल्याचे दाखविण्यात आले.

ग्राहक मंचचा युनियन बँकेला झटका
एटीएम मशीन प्रकरण : व्याजासह रक्कम परत देण्याचा आदेश
गोंदिया : एटीएम मशीनमधून पैसे न निघाल्यावरही तेवढे पैसे विड्राल झाल्याचे दाखविण्यात आले. संबंधितांना तक्रार करूनही पैसे परत न झाल्याने तक्रारकर्त्याने ग्राहक तक्रार निवरण न्यायमंचात धाव घेतली. सर्व प्रकरणाची कारणमिमांसा करून न्यायमंचाने सदर रक्कम ९ टक्के व्याज व नुकसान भरपाईसह देण्याचे आदेश युनियन बँकेला दिले.
रंजितकुमार सहदेव नंदरधने रा. डॉ. छत्रपती दुबे वार्ड, तिरोडा असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या एक्सिस बँकेच्या एटीएम कार्डद्वारे युनियन बँक आॅफ इंडिया साकोली शाखेच्या एटीएममधून प्रथम १० हजार व नंतर पाच हजार रूपये काढले. पण दोन्ही रकमा त्यांना प्राप्त झाल्या नाहीत, मात्र त्यांच्या खात्यातून त्याची कपात करण्यात आली. लगेच त्यांनी युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी एक्सिस बँकेशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्यास सांगितली.
नंदरधने यांनी रक्कम न निघाल्याची तक्रार १२ डिसेंबर २०१४ रोजी एक्सिस बँक गोंदियाचे शाखा व्यवस्थापकांकडे केली. त्यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे त्यांच्याकडे दुसरी तक्रार केली. ९ जानेवारी २०१५ रोजी नोटीस पाठविली. रिझर्व बँकेच्या धारणानुसार सात दिवसांत तक्रारीचे निवारण होणे गरजेचे असते. मात्र तसे न करता सदर प्रकरण लवादाकडे पाठविण्यात येईल, त्यानंतर त्यांची रक्कम जमा होईल, असे एक्सिस बँकेकडून सांगण्यात आले.
वारंवार करण्यात आलेल्या तक्रारीची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने, एटीएममधून पैसे न मिळाल्यामुळे व खात्यातून रकमेची कपात करण्यात आल्याने नंदरधने यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. मंचाकडून एक्सिस व युनियन बँकांना नोटीसेस पाठविण्यात आले. एक्सिस बँकेने आपल्या लेखी जबाबात, नंदरधने यांचा दावा युनियन बँकेला पाठविण्यात आला होता. परंतु ट्रॅन्झाक्शन सक्सेसफुल झाल्याचे सांगत त्यांनी दावा नाकारला. तसेच तक्रार प्राप्त होताच तक्रारीचा पाठपुरावा केल्याने एक्सिस बँकेकडून सेवेत कसलीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारिज करण्याची मागणी केली.
युनियन बँकेच्या लेखी जबाबानुसार, एटीएममध्ये जास्तीची रक्कम शिल्लक नव्हती. पण जेपी लॉगमधील रेकार्डनुसार ट्रॉन्झाक्शन सक्सेसफुल झाल्यामुळेच नंदरधने यांच्या खात्यातून रक्कम कपात करण्यात आली असून ही सेवेत त्रुटी नाही. नंदरधने यांची तक्रार खोटी असून पैसे उकळण्याच्या उद्देशाने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरच भादंविच्या कलम १९३ नुसार प्रकरण दाखल करावा व कंपेंसेटरी कॉस्ट ५० हजार रूपये बसवून भादंविच्या १९१ कलमान्वये कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र नंदरधने यांनी युनियन बँकेच्या एटीएमच्या पावत्या, एक्सिस बँकेचे विवरणपत्र, बँकेला केलेल्या लेखी तक्रारी, नोटीस, रिझर्व बँकेचे रिकॉन्सीलिएशन आॅफ फेल्ड ट्रॉन्झाक्शन अॅट एटीएम बाबतचे पत्र अशी सर्व कागदपत्रे दाखल केलेली होती. शिवाय त्यांनी जेपी लॉगमधील रेकार्डनुसार कॅश प्रेझेंट व त्यानंतर कॅश प्रेझेंट टाईम एक्सपायर्ड ट्रॅन्झाक्शन एन्ड, असे दर्शविण्यात आल्याने विड्राल झाले नाही, असा युक्तिवाद केला. एक्सिस बँकेतर्फे अॅड.ए.एन. मिश्रा, युनियन बँकेतर्फे अॅड.जे.एल. परमार यांनी युक्तिवाद केला.
यावर न्यायमंचाने कारणमिमां केली. मागणी करूनही युनियन बँकेने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही सादर केले नाही. ही सेवेतील त्रुटी असून तक्रारकर्ते नंदरधने यांनी तक्रार मंजूर केली.
तसेच नंदरधने यांना एटीएम मशीनमधून न मिळालेली १५ हजार रक्कम दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने ३० जानेवारी २०१५ पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावे, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ग्राहक नंदरधने यांना द्यावे, असा आदेश न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी पारित केला. (प्रतिनिधी)
ग्राहक न्यायमंचाची कारणमीमांसा
यावर न्यायमंचाने कारणमीमांसा केली. त्यात एटीएम विड्रालची रक्कम अनुक्रमे १० हजार व पाच हजार रूपये तक्रारकर्ते नंदरधने यांनी एटीएम मशीनमधून वेळेवर न उचलल्यामुळे ती रक्कम पुन्हा एटीएम मशीनमध्ये गेली. त्यामुळे ट्रॅन्झाक्शन पूर्ण न झाल्यामुळे एटीएम मशीनद्वारे सदर रक्कम मिळाली नसल्याचे सिद्ध झाले. तसेच जेपी लॉगद्वारे कॅश प्रेझेंटेड व कॅश टेकन असा रिमार्क आल्यामुळे एटीएम विड्रालद्वारे कॅश एटीएम आॅपरेटरला मिळाल्याचे सिद्ध होते. पण तक्रारकर्त्याच्या रेकार्ड नंबर्समध्ये कॅश टेकन असा रिमार्क जेपी लॉगमध्ये न दर्शविल्याने तक्रारकर्त्याला रक्कम मिळाली नाही व ती रक्कम युनियन बँकेने नंदरधने यांच्या खात्यातून कमी केले. तसेच वारंवार मागणी करूनही अकाऊंट स्टेटमेंट किंवा जेपी लॉग न देऊन निवारण न करणे, ही युनियन बँकेची सेवेतील त्रुटी असल्याचे सिद्ध झाले.