‘त्या’ वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध
By Admin | Updated: August 5, 2015 00:46 IST2015-08-05T00:46:36+5:302015-08-05T00:46:36+5:30
जिल्ह्यात घडलेल्या खूनाच्या गंभीर गुन्ह्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या उर्मट वर्तणुकीला सामोरे जावे लागले.

‘त्या’ वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध
आंदोलनाचा इशारा : खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
भंडारा : जिल्ह्यात घडलेल्या खूनाच्या गंभीर गुन्ह्याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या उर्मट वर्तणुकीला सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण अधिकारी असताना त्यांनी बेजबाबदारपणे असे वक्तव्य करणे गंभीर असून अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली, अशी माहिती माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, शहरात प्रीती पटेल यांचा खून आणि अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर शहरातील नागरिक दहशतीत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. त्यानंतर आपण स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची वेळ मागून दुपारी ४.३० वाजता भेटण्यासाठी त्यांना गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांचे समाधान न करता तुम्ही परवानगी घेता न आले, जिल्हा पोलीस अधीक्षकांना बोलाविण्याचे अधिकार आपल्याला नाहीत, मोर्चे काढा किंवा आंदोलने करा ते माझ्या अधिकारात येत नसल्याचे वक्तव्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असून भादंवि १६६, ५६५ कलमानुसार उर्मट भाषेत वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणीही भोंडेकर यांनी केली. प्रीती पटेल यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. यासाठी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.
या प्रकरणातील आरोपींना कोठडीत ठेवण्याऐवजी रुग्णालयात का? ठेवण्यात आले, असा आरोप करुन आरोपींना प्रशासन पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. दोन दिवसात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा ईशाराही भोंडेकर यांनी दिला. दरम्यान जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही. यावेळी उपसंपर्कप्रमुख चंदू राऊत, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, अनिल गायधने, सुरेश धुर्वे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)