शिवसेनेत सामसूम
By Admin | Updated: July 1, 2015 00:54 IST2015-07-01T00:54:12+5:302015-07-01T00:54:12+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाने वेग घेतला आहे.

शिवसेनेत सामसूम
कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास : प्रचाराची भिस्त उमेदवारांवर
भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाने वेग घेतला आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केवळ तीन दिवस प्रचाराची रणधुमाळी राहणार आहे. असे असताना राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारमधील शिवसेनेत मात्र जिल्ह्यात सामसुम वातावरण दिसत आहे.
भंडारा जिल्ह्याचे पालकत्व असलेले पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीकडे कानाडोळा केल्यामुळे शिवसेनेची भिस्त आता स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आली. उमेदवारीच्या वाटपापूर्वी संपर्कप्रमुख खासदार कृपाल तुमाने जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी काही ठिकाणी कार्यकर्ता मेळावेही घेतले परंतु, आता मात्र वरिष्ठ नेत्यांची वाणवा कार्यकर्त्यांमध्ये जाणवत आहे.
राज्यात युतीचे सरकार असले तरी भंडारा जिल्हा परिषदेत मात्र भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढत आहेत. २०१० मध्ये सेनेचे संख्याबळ केवळ दोनवर होते. आता राज्यात सत्ता असल्यामुळे शिवसेनेचा फौजफाटा प्रचाराला येईल, अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळूनही पालकमंत्री जिल्ह्यात प्रचारासाठी न आल्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेत सामसूम वातावरण आहे. पक्षाच्या चिन्हावर रिंगणात असलेले उमेदवार स्वत:च्या बळावर निवडणुकीचा किल्ला लढवित आहेत. उमेदवारी मागताना आपण सत्ता पक्षात असल्यामुळे पक्षाची ताकद पाठिशी राहील, अशी उमेदवारांची भाबडी अपेक्षा होती. अन्य पक्षाच्या नेत्यांकडून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक पक्षांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र शिवसेनेची अद्याप एकही मोठी सभा जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे चित्र असून मतदानापूर्वी मोठ्या नेत्याची किमान एक तरी सभा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)